भिगवण -येथील राष्ट्रीय महामार्गालगत भाजपाच्या वतीने दुधाच्या भाववाढीसाठी आंदोलन केले. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार आल्याबरोबर दुधाचे दर कमी झाले ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी बाब आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा दुधाला योग्य भाव देऊन त्यांना न्याय द्यावा, दुधाला योग्य भाव न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे यांनी दिला.
यावेळी कार्यकर्त्यांनी शासनविरोधी घोषणा देत दूध दरवाढ देण्याची मागणी केली. यावेळी तक्रारवाडीचे तलाठी गाडेकर व भिगवण पोलिसांना निवेदन देण्यात आले. भिगवण भाजपचे गटनेते संपत बंडगर यांनी शासनाकडे नियोजन नसल्याने शासन उदासीन असल्याची टीका केली.
यावेळी इंदापूर अर्बन बॅंकेचे माजी चेअरमन अशोक शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, इंदापूर अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अशोक शिंदे, माजी संचालक रंगनाथ देवकाते, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते, अशोक वणवे, दिनेश मारणे, माऊली मारकड, विकास वाघ उपस्थित होते.