पुणे – अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीअखेर 41 हजार 21 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अद्यापही 66 हजार 9 जागा रिक्त आहेत. प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे उघड होऊ लागले आहे.
पुणे विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 7 हजार 30 जागा आहेत. यासाठी 1 लाख 1 हजार 157 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. विद्यार्थ्यांची सोयीच्या व नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा लागली आहे. कॅपअंतर्गत प्रवेशासाठी 84 हजार 284 जागा उपलब्ध झाल्या. त्यातील 33 हजार 163 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून 51 हजार 121 जागा रिक्त आहेत.
इन हॉऊस कोट्याअंतर्गत 7 हजार 487 जागा होत्या. त्यातील 4 हजार 90 जागांवर प्रवेश झाले असून 3 हजार 397 जागा रिक्त आहेत. अल्पसंख्याक कोट्यांतर्गत 10 हजार 683 जागा होत्या. त्यातील 2 हजार 700 जागांवर प्रवेश निश्चित झाले असून 7 हजार 983 जागा रिक्त आहेत. व्यवस्थापन कोट्यांतर्गत 4 हजार 576 जागा दर्शवल्या होत्या. त्यातील 1 हजार 68 जागांवर प्रवेश झाले असून 3 हजार 508 जागा रिक्त आहेत.
दुसऱ्या नियमित फेरीसाठी 46 हजार 794 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 23 हजार 120 जणांना प्रवेश जाहीर झाला होता. त्यातल्या 10 हजार 658 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी इच्छुकता दर्शविली. मात्र, त्यातील 9 हजार 954 जणांनीच प्रवेश घेतला. 55 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. 13 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. 12 हजार 452 विद्यार्थ्यांनी प्रवेशाला काहीच प्रतिसाद दिला नाही. आता गुरुवारी (दि.10) प्रवेशाच्या नियमित तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होणार आहे. प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.