पुणे (प्रतिनिधी) – सोसायटीतील पाण्याच्या कनेक्शनवरुन पंचायत समितीच्या सदस्याने साथीदारांना घेऊन सोसायटीमध्ये मोठा राडा केला. यामध्ये एका सदस्यावर चाकूने तसेच फुटक्या बाटलीने वार केले. त्यांना थांबवण्यास आलेल्या पोलिसांनाही धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात पाच जणांवर मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
गिता सोहन चौधरी(38,रा.सिध्दी मार्के) व महिला पोलीस शिपाई वर्षा निकम यांनी फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब मोकाशी, शंतनु मोकाशी, ओंकार मोकाशी, अजीत जमादार. विष्णू खत्री अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील बाळासाहेब मोकाशी हा पंचायत समिती सदस्य आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाळासाहेब मोकाशी याचे सोसायटीमध्ये दुकान आहे. त्याच्या दुकानासाठी तो पाण्याचे बेकायदा कनेक्शन सोसायटीच्या टाकीवरुन घेत होता. यासाठी त्याने सोसायटीच्या टेरेसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यास कनेक्शन घेत असताना गिता चौधरी व इतरांनी विरोध केला. त्यावेळी त्याने गीता यांच्या पतीला तसेच इमारतीतील इतर महिलांना घाणेरडी शिवीगाळ केली. यानंतर गीता यांच्या पतीला चाकुने व फुटलेल्या बाटलीने वार केले.
ही बाब सोसायटीतील सदस्यांनी पोलिसांना कळवल्यावर घटनास्थळी उत्तमनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यावर ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन आले. तसेच पोलिसांना बदली करण्याची धमकी दिली. या दोन्ही प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बी.आर.झाडगे व ए.ई.दुगावकर करत आहेत.