प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक्स्प्रेस फीडर ट्रीप झाल्यामुळे विद्यापीठ परिसराचा वीज पुरवठा सकाळी दहा तास खंडित झाला होता. यामुळे जनरेटरच्या मदतीने कामकाज सुरू करावे लागले.
विद्यापीठात बुधवारी सकाळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. विद्यापीठातील एक्सप्रेस फिडर ट्रीप झाल्याबद्दल व पेट्रोलिंग करण्यासाठी विद्यापीठाचे सहायक अभियंता सागर पवार यांना कळवले तसेच विद्यापीठ तंत्रज्ञ कांबळे यांनाही कळविण्यात आलेले आहे. विद्यापीठाच्या सहायक अभियंता यांनी सांगितले की रात्रपाळीच्या ड्युटीमध्ये त्याचे कोणी कर्मचारी उपलब्ध नाहीत त्यामुळे ते पेट्रोलिंग करू शकत नाही. कर्मचारी उपलब्ध झाल्यावर लाइन पेट्रोलिंग करण्यात येईल, असे त्यांनी कळविले. हा दोष विद्यापीठ उच्चदाब ग्राहक यांच्या बाजूने असून वीज पुरवठ्यात होणारे व्यत्यय व खंडीत वीज पुरवठ्याची सर्व जबाबदारी ही विद्यापीठाची आहे. याला महावितरण जबाबदार नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
पावसाळामुळे फिडरमध्ये बिघाड झाला होता. तो दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे दुपारी दीड वाजता विद्यापीठातील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तात्काळ 50 जनरेटरच्या उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करण्यात आला. यामुळे कामकाज सुरळीतपणे सुरुच होते, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.