पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती अर्थात “वेस्टू टू एनर्जी” हा प्रकल्प कार्यन्वित करण्यात आला आहे. याठिकाणी निर्माण होणारी वीज महापालिकेच्या निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि चऱ्हाली येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वापरण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.
“वेस्ट टू एनर्जी”प्रकल्पाचे उद्घाटन 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर तांत्रिक बाबींमुळे प्रकल्प कार्यन्वित झाला नव्हता. मात्र, महापालिकेच्या पर्यावरण विभागाने संपूर्ण पूर्तता करून अखेर प्रकल्प कार्यन्वित केला आहे. सद्यस्थितीत दररोज 8 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जात असून 12 आणि 14 मेगावॅट वीजनिर्मिती चाचणीही केली आहे.
या प्रकल्पाची क्षमता 14 मेगावॅट आहे. टप्प्याटप्प्याने वाढ करून पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालविला जाईल. आता निर्माण झालेली वीज महापालिकेच्या निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रासाठी व चऱ्हाली येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी वापरली जात आहे. 12 मेगा वॅट वीज महापालिका वापरणार असून, 2 मेगावॅट वीज मोशी कचरा डेपो आणि प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे, असेही सह शहर अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले.