पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघा अवधी उरला आहे. निवडणुकांपूर्वी, भारतीय निवडणूक आयोगाने चित्रपट अभिनेता सोनू सूदची पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. वर्षभरापूर्वी निवडणूक आयोगाने सोनू सूदला पंजाबचा आयकॉन म्हणून नियुक्त केले होते.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू यांनी शुक्रवारी अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने 4 जानेवारी रोजी अभिनेता सूदची पंजाब राज्याचा आयकॉन म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे या निवेदनात दिले आहे.
दरम्यान, सिने अभिनेता सोनू सूदच्या राजकारणातील प्रवेशाबाबत चर्चा होत आहे. अभिनेत्याची बहीण मालविका पंजाब निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. करोनाच्या काळात लोकांना मदत करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सोनूने पंजाबमधील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतली आहे.