Lok Sabha Election 2024| काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली आहे. रणदीप सुरजेवाला पुढील ४८ तास कोणत्याही प्रकारच्या निवडणूक कार्यात सहभागी होऊ शकणार नाहीत आणि निवडणूक प्रचारापासूनही दूर राहतील. मात्र त्यांच्यावर ही कारवाई का करण्यात आली आहे. याबाबत जाणून घेऊयात.
हेमा मालिनी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रणदीप सिंग सुरजेवाला हे पहिले नेते आहेत ज्यांच्यावर निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कारवाई केली. रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणातील कैथल (कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघ) येथे इंडिया आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
सुरजेवाला यांचे स्पष्टीकरण Lok Sabha Election 2024|
सुरजेवाला यांच्या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘माझा हेतू हेमा मालिनी यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना दुखावण्याचा नव्हता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. तुम्ही संपूर्ण क्लिप पाहा, आम्ही हेमा मालिनी यांचा पूर्ण आदर करतो. त्यांचं लग्न धर्मेंद्रजी यांच्याशी झाले आहे आणि म्हणून त्या आमच्या सुनबाई आहेत.’
दरम्यान, 9 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांना हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होती. केवळ रणदीप सिंग सुरजेवाला यांनाच नाही, तर सध्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पत्र लिहिले होते, ज्यात त्यांना त्यांच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना निवडणूक आचारसंहितेबाबत माहिती देण्यास सांगण्यात आले होते. पक्षाच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही कंगना राणावतवर वादग्रस्त विधान केल्यामुळे हे करण्यात आले आहे.