नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्‍यक

कोल्हापूर – केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशक असून त्यामध्ये सर्व स्तरांवरील शिक्षणाचा विचार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तितक्‍याच प्रभावीपणे झाल्यास निर्धारित शैक्षणिक उद्दिष्टे गाठणे शक्‍य होईल, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष चर्चासत्रात उमटला.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ व महाविद्यालय विकास विभागातर्फे “नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, ज्येष्ठ अर्थ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. आर. के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते.

नव्या शैक्षणिक धोरणातील शालेय शिक्षणविषयक तरतुदींचा वेध घेताना डॉ. हिर्डेकर म्हणाले, शालेय शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाचा बोजा कमी करून सर्वंकष कौशल्य विकासावर देण्यात आलेला भर महत्त्वाचा आहे. कोठारी आयोगाचा 10+2+3+2 हा पॅटर्न 50 वर्षे व्यवस्थित आणि यशस्वीपणे चालला. आता तो 5+3+3+4 असा बदलण्यात आला आहे. हा वयाधारित पॅटर्न नाही, तर सर्वांगीण विकासाभिमुख अशी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

उच्चशिक्षणविषयक तरतुदींचा वेध घेताना डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत, सक्तीचे आणि देशभरात एकजिनसी, एकाच पॅटर्नचे करण्याचे महत्त्वाचे काम नव्या शैक्षणिक धोरणाने साध्य होणार आहे. उच्चशिक्षणाची पुनर्रचना आणि नवनिर्माण असे दुहेरी उद्दिष्ट धोरण बाळगून आहे. जागतिक दर्जाच्या बहुविद्याशाखीय शिक्षण संस्थांची निर्मिती करून त्या माध्यमातून सन 2030पर्यंत ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो (जीआआर) 50 टक्‍क्‍यांच्या घरात नेण्याचे उद्दिष्टही आहे. बुद्धिमान, सेवाव्रती आणि सशक्त नैतिक मूल्याधारित संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची माणसे घडविली जावीत, अशी अपेक्षा धोरणात आहे.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच घटकांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण मसुदा शब्दनिहाय समजून घेणे आवश्‍यक आहे. त्यातील कित्येक बाबी अगदी आजही प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेमध्ये अंगीकृत करणे, अंमलात आणणे सहजशक्‍य आहे. त्या दृष्टीने त्याचा विचार होणे आवश्‍यक आहे. कोठारी कमिशनच्या धोरण निर्मितीमध्ये महाराष्ट्राच्या डॉ. जे. पी. नाईक यांचे बहुमूल्य योगदान होते. या नव्या धोरणामध्येही डॉ. वसुधा कामत यांचे महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्‌गारही त्यांनी वाढले.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. भालबा विभुते, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. नीलेश बनसोडे, डॉ. मेघा पानसरे आदींनी सहभाग घेतला. चर्चासत्राच्या सुरुवातीला डॉ. पी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. टी. एस. भुतकर यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.