अबाऊट टर्न : भिंत

-हिमांशू

साहेब, आम्हाला शोधताय? कशासाठी साहेब? काय मिळणार तुम्हाला? फार तर दोन-चार संख्या! मेलेल्यांची संख्या आणि जिवंत राहिलेल्यांची संख्या. तिसरी संख्या जखमींची. त्यात दोन गट. गंभीर आणि किरकोळ जखमी. गंभीरमध्ये पुन्हा दोन गट. अत्यवस्थ आणि कायमचं अपंगत्व आलेले. अत्यवस्थांचा फॉलो-अप घेतलात तर मरणाऱ्यांच्या वाढत्या संख्येचे अपडेट मिळत राहतील दोन-पाच दिवस. आईशपथ सांगतो साहेब, याव्यतिरिक्‍त दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला इथं… या ढिगाऱ्यात! ढिगारे उपसायला आलेली माणसं आम्ही… ढिगाऱ्याखालीच मरणार हे चिरंतन सत्य.

जग बदललं म्हणून सत्य नाही बदलत साहेब! तुमच्या शहराच्या सुंदर चेहऱ्यावर आलेलं कोड म्हणजे आमची गलिच्छ वस्ती… पत्र्यांची! चकचकीत मोटारींच्या टायरलासुद्धा या वस्तीच्या धुळीची ऍलर्जी. आमच्याकडे बघून डोळे तर मिटतातच लोकांचे आपोआप… तरतरीत नाकंही लपून जातात रुमालाच्या घडीमागं. “कुठून आली ही घाण…’ हे वाक्‍य बोलण्यासाठीही कुणी तोंड उघडत नाही. अहो, तोंड उघडले आणि संसर्गाचे जंतू शरीरात शिरले तर? मग हे वाक्‍य लिहून दाखवलं जातं कपाळावरच्या आठ्यांमधून! जा इथून साहेब, जिवंतपणीच अंगात किडे पडलेल्यांच्या मृतदेहांची दुर्गंधी अत्यंत वाईट. भूक मरेल तुमची. तसं झालं तर शहर कोण चालवणार? भूक आहे म्हणून शहर आहे. आमची भूक जरा कमी; पण आहेच. भुकेच्या बेरजेचाच हा ढिगारा!

ते बघा साहेब, भिजलेल्या दगडविटा फेकून तो पत्रा उचकटला अग्निशमनदलाच्या जवानांनी. चेपलेलं जर्मनचं पातेलं उघडं पडलं, काल रात्रीची भूक दिसेल तुम्हाला त्यात. तळाशी करपलेली, भातासारखं दिसणार काहीतरी शिजवलं होतं त्या बाईनं रात्री. भरपावसात घामानं भिजलेल्या, थकलेल्या, शिव्या खाऊन आलेल्या तिच्या नवऱ्यानं बोटं चाटून-चाटून फस्त केलं. तळातली खरवड बाईनं खाल्ली. मग उरलेलं तिखटजाळ कालवण पिऊन दोन आगींची भांडणं लावली पोटात. पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज भीतीदायक खरा; पण दमून-भागून आलेल्या, कोरडी जमीन शोधून घोरत पडलेल्या कळकट देहाच्या माणसांनी तेच पार्श्‍वसंगीत समजून स्वप्नं बघायला सुरुवात केली… अगदी छोटी-छोटी स्वप्नं!

घराचे ठेपे वाढवण्याची किंवा गळती काढून घरातली कोरडी जमीन वाढवण्याची! गावाकडची कोरडी जमीन इकडे घेऊन आली आणि शहरात ओली जमीन मिळाली ती अशी! ही ओल झिरपत-झिरपत तुमच्या कुंपणभिंतीत कशी शिरली, कळलंच नाही हो! अल्याड आम्ही; पल्याड तुम्ही. तुम्हाला आम्ही दिसू नये म्हणून बांधलेली ही भिंत पडली तीही रात्रीच्या अंधारात! वास्तवाचं दर्शन भगभगीत उजेडात अचानक घडू नये, याची काळजी घेऊन. भिंतच ती… किमान डोळे बचावतील एवढी मजबूत असायलाच हवी. आता थेट ढिगाराच!

जा साहेब, त्या बाईचा पदर दिसायला लागलाय. ती संपूर्ण दिसू लागायच्या आधी निघून जा! मृतदेहांचं काय… मोजेलच कुणीतरी. संख्या वाढू लागली तर डझनावर मोजू आपण. त्याची फिकीर नका करू. तुम्ही चौकशी करा, भिंत पडलीच कशी? तुमच्या-आमच्यात फाळणी करणाऱ्या या उंच भिंतीचा पाया एवढा तकलादू कसा राहिला? भिंतींचे ढिगारे होतात तेव्हा त्यातून नको त्या विषवल्ली उगवतात, हे बांधणाऱ्याला ठाऊक नव्हतं का? चौकशी
करा साहेब!

Leave A Reply

Your email address will not be published.