शिलॉंगजवळ युरेनियम व सोन्याचे साठे
कलकत्ता, दि. 16 – शिलॉंग जवळील भूमीत युरेनिअम व सोन्याचे साठे असल्याच्या खुणा आढळल्या आहेत, असे खाण खात्याचे उपमंत्री सुखदेव प्रसाद यांनी सांगितले.
भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणीचे काम चालविले आहे. युरेनियम व सोने याशिवाय तांबे, झिंक, शिसे यांचे साठे तिथे असावेत, असे वाटते. अलीकडेच आंध्र-कर्नाटक सीमेवर सोन्याच्या खाणी आढळून आल्या. त्याचा उल्लेख करून प्रसाद म्हणाले, “सोने काढण्यास प्रारंभ झाला आहे.’
मोहोंजोदरो येथे सुवर्ण लंका होती?
नवी दिल्ली – मोहोंजदरो ही दशमुखी रावणाची लंका होती का? येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रोनॉलॉजीचे संचालक एस. बी. रॉय यांच्या मते ही शक्यता केवळ कल्पना शक्तीचा एक भाग म्हणून पूर्णपणे नाकारता येणार नाही.
पुराणवस्तू शास्त्र व साहित्य यात या संबंधात काही पुरावे असून ही कल्पना स्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारण्यापूर्वी याचे सखोल संशोधन झाले पाहिजे, असे रॉय म्हणाले. इतिहासाच्या पाऊलखुणांतील अनेक रहस्य सध्या उलगडली जात आहेत.