चीन प्रत्येक नागरिकाला आपल्या सेलफोनवर सरकारचे ऍप डाऊनलोड करायला भाग पाडत आहे, ज्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये असलेले व्हिडिओज, मेसेजेस वरती लक्ष ठेवून सरकारला त्यांना पकडता येईल.
चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक सुरू झाल्याने अनेक भागात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. चीनमधील या झिरो कोविड धोरणाबाबत देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. चीनमध्ये होणारी निदर्शने थांबविण्याकरिता, येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी करण्याकरता आणि निदर्शनांमध्ये भाग घेतलेल्यांना पकडण्याकरिता, चीन मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहे. उदाहरणार्थ, फेशियल रेकॉग्निशन, या तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीमध्ये, निदर्शनामध्ये, भाग घेतलेल्यांना, आरडाओरडा करणाऱ्यांना, सोशल मीडियावरती चीन सरकारच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्यांना, व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना, गर्दीतून पकडत आहे आणि तुरुंगात टाकत आहे.
चॅट, मेसेजिंग ऍप्स, एनक्रिप्टेड ऍप्स, व्हॉट्सऍपवरती लक्ष
चीन वेगवेगळ्या चॅट ग्रुपमध्ये, मेसेजिंग ऍप्समध्ये तिथल्या ऍडमिनिस्टरला जबाबदार बनवून, तिथे टाकल्या जाणारी माहिती, पोस्टला सेन्सर करत आहे किंवा सरकारविरोधी पोस्ट टाकणाऱ्यांना पकडत आहे. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद व्यक्तींना गर्दीतून नेमके पकडणे अतिशय आव्हानात्मक असते. चिनी पोलिसांना स्पेशल गॉगल्स किंवा चष्मे दिले गेले आहेत. ज्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उभे राहून तिथे असलेल्या संशयास्पद शक्तींना ते सरकारकडे असलेल्या डेटाच्या मदतीने, त्यांच्या चेहऱ्याच्या मदतीने पकडू शकतात.
गर्दीच्या ठिकाणी रोबो पोलीस तैनात
चिनी सरकारने रेल्वे स्टेशन, बस स्टॉपसारख्या गर्दीच्या ठिकाणी रोबो पोलीस तैनात केले आहे, जे गर्दीमध्ये लपलेल्या, जामिनावर पळून गेलेल्या, हिंसाचारात भाग घेतलेल्या संशयित व्यक्तींना पकडू शकते. हिंसाचार झाला की, तिथे हिंसाचार करणाऱ्यांच्या शिवाय बघ्यांची किंवा आगंतुक नागरिकांची गर्दी जमा होते, ज्यामुळे हिंसाचारावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. अशाप्रकारचे बघे हिंसाचार बघण्याकरता, त्याचे व्हिडिओज काढण्याकरता, एकत्र झाले की आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चिनी पोलीस लगेच त्यांना त्यांच्या मोबाइलवरती मेसेज पाठवतात, पटकन तिकडून चालले जा नाहीतर तुम्हाला पकडण्यात येईल. यामुळे बघ्यांची गर्दी कमी होते आणि हिंसाचार करणाऱ्यांना पकडण्यात मदत मिळते. सोशल मीडियावरती असलेल्या प्रत्येक नागरिकांच्या पोस्टवरती लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला त्यांच्या कुटुंबाशी, त्यांच्या राहणाऱ्या जागेची जोडले गेलेले आहे, त्यामुळे गरज पडली तर त्यांना पकडणे सोपे होते. यामुळे जे नागरिक हिंसाचार झाल्यानंतर किंवा निदर्शनानंतर पळून गेले होते त्यांनासुद्धा त्यांच्या घरातून पकडले जात आहे.
भविष्य सांगणारे सॉफ्टवेअर (प्रेडिक्टिव्ह सॉफ्टवेअर)
भारत डेटा प्रायव्हसीचे नियम आणि कायदे आणत आहे. मात्र, चीनने त्यांच्या नागरिकांची पूर्ण माहिती गोळा केलेली आहे. यामुळे भविष्य सांगणारे सॉफ्टवेअरच्या (प्रेडिक्टिव्ह सॉफ्टवेअर) मदतीने जे नागरिक सरकारकरता त्रासदायक बनू शकतील किंवा निदर्शनात भाग घेतील किंवा सरकार विरोधात लिहितील, अशांना प्रेडिक्टिव्ह सॉफ्टवेअरच्या मदतीने सांगितले जाते की सरकारचे तुमच्यावरती लक्ष आहे, कुठल्याही सरकार विरोधामध्ये भाग घेऊ नका, याच सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यांना पकडलेही जाते.
करोना किंवा चिनी व्हायरसच्या काळामध्ये प्रत्येक चिनी नागरिकाला एक क्यूआर कोड देण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांना करोना झाला आहे की नाही हे करायचे आणि हीच माहिती सरकारलासुद्धा माहिती असायची. जर करोना झाला असेल तर त्यांचा कोड लाल रंगाचा व्हायचा, ज्यामुळे त्यांना घराच्या बाहेर जाण्याकरता किंवा गर्दी असलेल्या ठिकाणात जाण्याकरता बंदी केली जायची. अर्थात, करोना कंट्रोल करण्याकरता हे वापरले जात होते, परंतु आता याचा वापर चिनी सरकार नागरिकांना निदर्शनाला जाण्यापासून थांबवण्याकरता करत आहे. जर तुमचा हेल्थ कोड लाल झाला, तर तुम्हाला कुठेही जाण्यापासून बंदी केली जाते. अशाप्रकारची बंदी अनेक नागरिकांवरती लादण्यात आली होती. करोना झाला नसला तरीही लोकांना पब्लिक प्लेसमध्ये जाण्यापासून थांबवण्याकरता, त्यांचा हेल्थकोड किंवा स्कॅन लाल करण्यात आला होता. अशा सगळ्या नागरिकांना त्यांच्या सेलफोनवरती मेसेज मिळत होता की तुम्ही कुठे बाहेर जाऊ नका. जे नियम तोडून घराच्या बाहेर पडले, त्यांना पकडून डिटेंशन/आयसोलेशन सेंटर किंवा अलगीकरण वॉर्डमध्ये पाठवण्यात येत आहे.
सोनिक गन, ड्रोनचा वापर
निदर्शनामध्ये भाग घेणाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओज काढण्याकरता आणि त्यांची माहिती, लगेच कंट्रोल रूममध्ये पाठवण्याकरता, ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. ज्यामुळे आकाशातून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढले जातात आणि भाग घेणारे कधीपण सांगू शकत नाही की, आम्ही निदर्शनाकरता गेलो नव्हतो. आकाशातून फोटो आणि व्हिडिओज काढणे अतिशय सोपे असते आणि यामुळे पूर्ण गर्दीवरती लक्ष ठेवणे अतिशय सोपे होते. ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुष्कळ जास्त जागेवर लक्ष ठेवता येते.
सोनिक गन सोनिक रे फायर करते. ज्यांच्यावरती फायर होते त्यांना अनेक जैविक परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की सोनिक व्हायब्रेशनच्या मदतीने कानावरती, डोळ्यावरती, पोटावरती, किडनीवरती आणि मस्तकामध्ये नागरिकांना काही काळ वेदना होतात आणि इतर पुष्कळशा जैविक परिणामांना सामोरे जावे लागते. काही सोनिक गन एवढ्या मोठ्या असतात, की त्यांना वाहनावर बसवले जाते आणि तिथून फायर केले जाते.
जगातली सर्वात मोठी सर्वसमावेशक सरव्हेलन्स सिस्टिम
चीनने आपल्या नागरिकांवरती लक्ष ठेवण्याकरता जगातली सर्वात मोठी, सर्वात सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सरव्हेलन्स सिस्टिम तयार केलेली आहे. तिच्या आसपास जगातले कुठलेही देश पोहोचू शकत नाही. या सर्व सरव्हेलन्स सिस्टिमच्या मदतीने चीन आपल्या सगळ्या अल्पसंख्याक, उईघुर मुस्लीस, तिबेट आणि मंगोलियामधील लोकांवर लक्ष ठेवून आहे. कुठलीही सरकारविरोधी कारवाई दिसली की त्यांना लगेच रिफोरमेटरिजमध्ये पाठवले जाते.
आता चीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा “न भूतो न भविष्यति’ अशा पद्धतीने शोध लावीत आहे आणि वापर करत आहे. यामुळे चीनला यापुढे चिनी सरकारच्या विरोधातील कुठलेही आंदोलन अगदी सहज चिरडता येईल. गेल्या 33 वर्षांतील देशातील सर्वात मोठा विरोध दडपण्यासाठी चीन सरकार बंदुका आणि रणगाड्यांच्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे.