दखल : अन्नसाखळी तुटू नये!

– विठ्ठल वळसेपाटील

वनस्पती शाकाहारी प्राणी खातात. या शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी जगतात अशी ही अन्नसाखळी आहे. एकमेकांवर अवलंबून जीवनचक्र चालू आहे. या निसर्गाच्या परिसंस्थेत प्रत्येकाचं एक नातं विणलेलं असतं.

निसर्गाचे सृष्टीभांडार टिकवण्यासाठी वन व वन्यजीव यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे. वन व वन्यजीव मानवी विकासाचे बळी जाऊ नये. वने समृद्ध होण्यासाठी वनातील अन्नसाखळी महत्त्वाची आहे. सजीवसृष्टीत प्राणी आणि मनुष्य संबंध अनादी काळापासून असून ते वृद्धिगंत व्हावे. घटते पर्जन्य, बदलते हवामान याचा परिणाम मानवावर होतोय तसा तो वन आणि वन्यजीवांवरही होतो.

बेसुमार वाढती लोकसंख्या त्यांच्या वाढत्या गरजा, आधुनिक जीवनशैली यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीला ओरबाडणे सुरू झाले. वन्यजीव, विविध वृक्ष नष्ट होऊ लागले. जंगले कमी झाली. त्या ठिकाणी हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे “समृद्ध वने’ ही संकल्पना लयास जाऊन “ओसाड वने’ उभी राहिली.

शासनाच्यावतीने भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्‍के वनाच्छादनासाठी प्रयत्न सुरू आहेत. 15 जून ते 30 सप्टेंबर याकाळात वन महोत्सव साजरा केला जात आहे. जागतिक पर्यावरणदिनापासून स्थानिक स्वराज्य संस्था, पक्ष, संघटना व सामाजिक संस्था यांच्या मार्फत वृक्ष लागवड केली जाते. या आधारे निसर्गप्रेमी मंडळींनी समृद्ध पर्यावरणासाठी देशी पद्धतीची व आयुर्मान जास्त असलेली, खोलवर रुजणारी झाडे लावली पाहिजेत. याची मार्गदर्शिका वन विभागाने सादर केली पाहिजे. कारण देशी झाडांची साल, पाने, फुले, फळे, शेंगा, बिया, डिंक, चीक सर्व मानव आणि वन्यजीवांच्या उपयोगी पडते. अन्नसाखळीसाठी देशी झाडे फायद्यांची आहेत. झाडांची फळं माकड तसेच पक्ष्यांचे अन्न आहे. रानबाभूळ ओबडधोबड झाड परंतु या झाडापासून बहुपयोगी डिंक, पाल्याच्या चारा म्हणून तर लाकूड इंधन म्हणून उपयोग होतो.

बहुपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, साल, कवठ याशिवाय साधी बाभूळ, हिवर, धावडा, आपटा, भोकर, आवळा, पांगारा, पिपरी, नांदूक, मोह, पारिजातक, शिंदी, करंज, चंदन, कुसुम, बिबवा, खैर, हिंगण, गोधन, रानभेंडी, अर्जुन अशी भारतीय देशी झाडे आहेत. तसेच करवंदं, तरवड, मुरुडशेंग, निर्गुडी, अश्‍वगंधा, बोरकर ही झुडपे तर वेलीत गुंज, शेवरी, कावळी, अनंतमूळ तर फळ झाडांत रामफळ, अंजीर, सीताफळ, चिक्‍कू, पेरू, तुती, शेवगा, हादगा, लिंबुनी, जांभूळ तर गवतात कुसळी गवत, एकदांडी, माकडशिंगी, पसरी गवत, गोधडी हे गवत केवळ खाद्य नव्हे तर चांगल्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात. अनेक काटेरी वनस्पती व फुलझाडी यांवर फुलपाखरे, भुंगे, मधमाशा राहतात. त्यामुळे परागी भवन सुरळीत चालू राहते. विदेशी झाडांना फळे व फुले लगडत नाहीत त्यामुळे पोपट, मैना, साळुंकी, सुतार पक्षी, धीवर, घार, ससाणा, बगळे असे अनेक पक्षी हळूहळू नाहीसे होत आहेत. पोपटांचा थवा हा फक्‍त मुलांच्या गोष्टीतला व आठवणीतला विषय बनला आहे.

देशी झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनीला घट्ट पकडून ठेवणारी असतात. तसेच कमी पावसावर तग धरून जिवंत राहतात. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. खोट्या समजुतीने परदेशी कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, स्पॅथोडिया, रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे. ही परदेशी झाडे पर्यावरणास घातक असल्याचे संशोधनावरून सिद्ध झाले आहे. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपत्ती नष्ट होत आहे. जंगल कमी होत असल्यामुळे रानससे, घोरपड, खोकड, माकड, खार, शेकरू खार, खवले मांजर, साळींदर, हरणाचे कळप, रानडुक्‍कर, मुंगूस असे प्राणी नष्ट होत आहेत. तर या प्राण्यांवर जगणारे बिबट्या, वाघ, लांडगा, तरस हे प्राणी जंगलात काही भक्ष्य मिळत नसल्याने जंगल सोडून मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत.

वाइल्ड लाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्व्हेत 2019 या वर्षात देशात 110 वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. यात मध्य प्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात 34 वाघांची शिकार झाली आहे, तर याच वर्षात 491 बिबटे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. 2018 व 2019 या दोन वर्षात भारतात एकूण 886 बिबटे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या 17 वर्षांत बिबट्यांच्या संख्येत सुमारे 82 टक्‍के इतकी घट झाली आहे. 

चित्ता जसा नामशेष झाला तसे इतर प्राणी नामशेष होता कामा नये. वन व वन्यजीव रक्षण करण्याची वेळ आली आहे. जंगलातील अन्नसाखळी निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हिरवा चारा व फळे, फुले, असणारी देशी वृक्षांची लागवड आवश्‍यक आहे. शासनाने या गोष्टी केल्या नाहीत तर जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने मानवी वस्तीकडे हिंस्र प्राण्यांचे होणारे अतिक्रण रोखणं अवघड होणार आहे. वने व अन्नसाखळी टिकली तरच पर्यावरणाचे पर्यायाने मानवाचे अस्तित्व राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.