लक्षवेधी : वायूसेना ही लष्कराला दुय्यम नव्हे

– स्वप्निल श्रोत्री

लष्कर आणि वायूसेना हे एकमेकांना पूरक आहेत. जेथे लष्कराची गरज आहे तेथे लष्कर तैनात करणे योग्य असते आणि जेथे वायूसेनेची गरज असेल तेथे वायूसेनाच कारवाई करू शकते.

कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने सैन्यदलाला विशेष महत्त्व आहे. राष्ट्राच्या सीमा अबाधित राखणे, परकीय आक्रमणापासून राष्ट्राचे संरक्षण करणे आणि वेळ पडली तर शत्रूराष्ट्राच्या अंतर्गत सीमेत घुसून देशाच्या शत्रूंचा नायनाट करणे यांसारखी कामे सैन्यदलामार्फत केली जातात.

सैन्यदलात साधारणपणे तीन प्रकारच्या सेनादलांचा समावेश केला जातो. जमिनीवरील हालचालींसाठी भूदल अथवा लष्कर, समुद्रातील हालचालींसाठी नौदल आणि हवाई सुरक्षेसाठी वायूसेना किंवा हवाईदल असते. वास्तविक पाहता या तीनही दलाचे कार्यक्षेत्र वेगळे असून सर्वांचेच आपापल्या क्षेत्रात महत्त्व आहे. त्यामुळे तीनही सेनादले सक्षम असणे व त्यांच्यामधे योग्य समन्वय असणे हे राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

सदर विषयावर लेखन करण्याचे कारण म्हणजे, भारताचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी एका विषयावर बोलताना भारतीय वायूसेना ही लष्कराला दुय्यम असून लष्कराच्या मदतीसाठी तिचे सहकार्य अपेक्षित असल्याचे वक्‍तव्य केले होते. जनरल रावत यांच्या वक्‍तव्यानंतर वायूसेनेतून तीव्र प्रतिक्रिया आल्या असून वायूसेना प्रमुख राकेश सिंह भदोरिया यांनी वायूसेना ही लष्कराला दुय्यम नसल्याचे सांगितले.

वास्तविक भारतीय सेना दलात अशा प्रकारचे वक्‍तव्य येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लष्कर आणि वायूसेना हे एकमेकांना पूरक आहेत. जेथे लष्कराची गरज आहे तेथे लष्कर तैनात करणे योग्य असते आणि जेथे वायूसेनेची गरज असेल तेथे वायूसेनाच कारवाई करू शकते त्यामुळे कोण श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ हा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.

गौरवशाली भारतीय वायूसेना

1) भारतीय वायूसेना ही जगातील चौथी सर्वात शक्‍तिशाली वायूसेना म्हणून ओळखली जाते.
2) जगातील सर्वात उंच युद्धभूमी अर्थात सियाचीनवर भारतीय वायूसेनेचा तळ असून असा पराक्रम करणारी भारतीय वायूसेना ही जगातील एकमेव वायूसेना आहे.
3) राष्ट्रीय आपत्तीच्या काळात लष्कर आणि एनडीआरएफ बरोबर भारतीय वायूसेना ही सर्वसामान्य नागरिकांना आपली सेवा देते, असे चित्र फार कमी देशांमध्ये पाहावयास मिळते.
4) सन 1971 चे भारत-पाक युद्ध आणि सन 1999 च्या कारगील युद्धात भारतीय वायूसेनेने निर्णायक कामगिरी बजावली होती.

1965 पासून स्वतंत्र कारवाईस सुरुवात

भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत भारतीय वायूसेना ही ब्रिटिशांची “रॉयल भारतीय वायूसेना’ म्हणून ओळखली जात होती. सन 1950 मध्ये भारत सरकारने वायूसेनेच्या नावातून रॉयल हा शब्द काढून “भारतीय वायूसेना’ असे नामकरण केले.

सन 1947 मध्ये काश्‍मिरात राजकीय परिस्थिती खराब झाल्याबरोबर भारतीय वायूसेनेने मोठ्या प्रमाणात भारतीय लष्कराची ने-आण युद्धभूमीवर केली होती. परिणामी, जम्मू आणि काश्‍मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या तावडीतून वाचवण्यास भारताला यश आले. यावेळी भारतीय वायूसेना मुख्य कारवाईत सहभागी झाली नव्हती.

सन 1962 च्या भारत-चीन युद्धात भारतीय वायूसेनेचा वापर केला गेला नाही. परिणामी, आजही जेव्हा भारताच्या पराभवाची मीमांसा केली जाते तेव्हा युद्धात वायूसेनेच्या क्षमतेचा वापर न करणे हे कारण पराभवास जबाबदार असल्याचे म्हटले जाते.

सन 1965 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पूर्वी झालेल्या चुकांमधून शिकत भारत सरकारने भारतीय वायूसेनेच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. वायूसेनेच्या इतिहासातील ही पहिली घटना होती जेव्हा भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या वायूसेनेचा सामना केला. पाकिस्तानला अमेरिकेने पुरवलेल्या तत्कालिक आधुनिक विमानांचा सामना भारतीय वायूसेनेच्या दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या 30 वर्षे जुन्या विमानांनी केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या हवाई हद्दीवर आपले वर्चस्व कायम केले.

सन 1947 ते सन 1965 च्या भारत-पाक युद्धापर्यंत भारतीय वायूसेनेने युद्धभूमीवर सैन्याची ने-आण करणे, युद्धसामग्री पोहोचविणे अशा प्रकारची कामे केली. सन 1947 मध्ये जर भारतीय वायूसेनेस स्वतंत्र कारवाईची मुभा मिळाली असती, तर कदाचित पाकव्याप्त काश्‍मीर असा प्रकारच कधी जन्माला आला नसता.

शेकटकर समितीचा अहवाल

सन 1999 च्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. पण हे युद्ध गरजेपेक्षा जास्त दिवस लांबले आणि अनेक भारतीय जवान नाहक युद्धात कामी आले. कारगिल युद्धात भारतीय सेनेच्या तिन्ही तुकड्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आणि युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात वायूसेनेला स्वतंत्र कारवाईची मुभा मिळाली. ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत वायूसेनेने आक्रमक कारवाई केली. कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोर हे हिमालयाच्या उंच टेकडीवर बसून गोळीबार करीत होते तर भारतीय लष्कर खाली जमिनीवर होते त्यामुळे पाकिस्तानी घुसखोरांना वरून खाली टेहळणी करून जवानांवर अचूक गोळीबार करणे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत सोपे होते. अशा परिस्थितीत भारतीय लष्कराने अभूतपूर्व कामगिरी करीत घुसखोरांचा नायनाट केला पण हेच काम जर युद्धाच्या सुरुवातीलाच वायूसेनेकडे दिले असते, तर युद्धाचा कालावधी आणि जवानांचे प्राण वाचविता आले असते. परिणामी, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने ले. ज. दत्तात्रय शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली युद्धाची कारणमीमांसा करण्यासाठी समिती नेमली. सदर समितीने दिलेल्या आपल्या अहवालात सेनादलांमध्ये समन्वयासाठी सीडीएस हे पद निर्माण करण्याची शिफारस केली होती.

सीडीएसचे काम समन्वय साधण्याचे

भारताच्या तीनही सेनादलांचा समन्वय राहावा यासाठी सीडीएस हे पद निर्माण केले गेले आहे. भारतीय सेना दलातील सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ अधिकाऱ्याकडे हे पद देण्यात आले असून ते राष्ट्रपतींचे लष्करी सल्लागार आहेत. त्यामुळे सदर पदावर बसलेल्या व्यक्‍तीकडून जबाबदार विधाने अपेक्षित आहेत. विनाकारण काहीतरी बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा देशाची सुरक्षा अजून कशी मजबूत करता येईल याकडे सीडीएस पदावर बसणाऱ्या व्यक्‍तीने लक्ष देणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.