कलंदर : बेबंदशाही?

-उत्तम पिंगळे

काल झोपेत जे पाहिले ते अजूनही समोर तरळत आहे. महाराजांनी मोरोपंतांना पाचारण केले.

महाराज : या… मोरोपंत या…
मोरोपंत : (मुजरा करत) महाराज, तातडीचा निरोप आला म्हणून लगबगीने निघालो.

महाराज : बसा… (मोरोपंत बसतात) आम्ही हे काय ऐकत आहोत? आमच्या राज्याची चक्‍क दुर्दशा होत आहे? परवा मौजे चिपळूण मुक्‍कामी धरणाची पूर्ण भिंत वाहून गेली अशी वार्ता आहे.
मोरोपंत : बरोबर आहे महाराज, बाजूच्या वस्तीतील गावातील सुमारे वीस-एक जण यामध्ये मरण पावले असे समजते.

महाराज : मग आपले शासन काय करत होते? कुंभकर्णासारखे झोपले होते का?
मोरोपंत : महाराज असेही कानी आले की तीन मासपूर्व पोलीसपाटील व वतनदार यांनी शासनास या धरणाची माहिती दिली होती पण तरीही… (त्यांना थांबवत)

महाराज : तरीही काहीही कारवाई झाली नाही. हे धरण बांधून अजून दोन दशकेही पूर्ण झाली नाहीत. आपला सिंधुदुर्ग तर शेकडो वर्षे समुद्राच्या लाटा अंगावर झेलत डौलाने उभा आहे.
मोरोपंत : बरोबर आहे आपले महाराज पण…(पुन्हा थांबवत)

महाराज : पण काय, आम्ही असे ऐकले की अलीकडे राज्यात विज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. असे असूनही एक छोटे धरण आपण नीट बांधू शकलो नाही?
मोरोपंत : गुप्तहेरांनी अशी बातमी आणली आहे की बांधकामात काहीतरी हलगर्जी झाली म्हणून असे घडले.

महाराज : बरोबरच आहे, त्याशिवाय असे घडू शकत नाही. येथील अंमलदार म्हणे खेकड्यांनी धरण पोखरले असावे असा पोरखेळी शब्द वापरून रयतेस संभ्रमित करीत आहे?
मोरोपंत : होय महाराज, यावर रयतेने कसा विश्‍वास ठेवावा? गडकोटांच्या भिंती समोर हत्ती जरी चाल करून आले तरी डगमगत नाहीत.

महाराज : मी तर असे ऐकले आहे की राज्यातील नदीनाले व इतर रस्त्यांवरील साकव पडू लागले आहेत व त्याचीही दुरुस्ती रखडलेली आहे.
मोरोपंत : बरोबर आहे महाराज, अनेक ठिकाणी भ्रष्ट अधिकारी कार्य करीत असल्याने सामान्यांची अडवणूक होत आहे व ते इतके बेडर झाले आहेत की नक्‍कीच कोणीतरी त्यांच्या वरील असामीचा त्यांच्यावर वरदहस्त असावा नाहीतर असे होणे शक्‍य नाही.

महाराज : मग असे लोक सरकारात येतातच कसे?
मोरोपंत : लोकशाही नामक जनतेची जनतेसाठी जनतेने निवडलेल्या राज्याची एक पद्धत अवलंबली जाते पण ती नावापुरती असून सामान्य रयत त्यापासून कोसो दूर गेली आहे. धनदांडगे कित्येक मोहरा पेरून आपण कसे निवडून येऊ याची बेगमी करत असतात.

महाराज : म्हणजे यास रयतदेखील तेवढीच जबाबदार आहे कारण मोहरा देणारी व्यक्‍ती दानधर्म म्हणून देणार थोडीच? नाही, मग कारभारात भ्रष्टाचार आणून जमेल तेथून, परवाने देण्यामध्ये व बांधकामे करण्यामध्ये त्याची वसुली होत असावी म्हणूनच असे अपघात, घातपात राज्यात होत असून राज्यातील रयतेची दुर्दशा झाली आहे.
मोरोपंत : बरोबर आहे महाराज, आपण नव्याने अवतार घेण्याची वेळ पुन्हा आलेली दिसते. नाही तर आपणच आपल्या राज्यातील सरदारांच्या स्वप्नात जाऊन त्यांनाही काही उपदेशाचे डोस पाजावेत.

महाराज : ठीक आहे मोरोपंत. या आपण बघूया काय करायचे ते. (मोरोपंत मुजरा करून जातात.)

Leave A Reply

Your email address will not be published.