कलंदर : व्हीव्हीपॅट पे नो चॅट…

संग्रहित छायाचित्र....

-उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो होतो. गेले आठवडाभर मी त्यांच्याकडे न गेल्यामुळे त्यांनी अगदी रूंद आवाजात माझे स्वागत केले.

विसरभोळे : या… या…आठवडाभर दिसला नाहीत?

मी : काय उकाडा होतोय, बाहेर पडणे अवघड झाले आहे. म्हणूनच आज सकाळीच आलो.

विसरभोळे : मग काय हालहवाल?

मी : ठीक आहे, आता निवडणुकीचे मोठे टप्पे पार पडले आहेत तसेच निकाल 23 तारखेला लागणार आहे. पण यावेळी म्हणे निकाल लागण्यास चार पाच तास अधिक लागतील कारण प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे.

विसरभोळे : हो बरोबर आहे, कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच बूथमधील व्हीव्हीपॅट मोजावयाच्या आहेत. परवा सर्व विरोधक सुप्रीम कोर्टात 50 टक्‍क्‍यांहून अधिक व्हीव्हीपॅट मोजणी व्हावी म्हणून गेले होते आणि ती मागणी मान्य झाली असती तर मग किती वेळ गेला असता.

मी : होय, पूर्वी जसे दिवस दोन दिवस मतमोजणी चालू असायची तसेच झाले असते, यावर आपले मत काय सर?

विसरभोळे : हा केवळ काही राजकीय पक्षांचा तमाशा आहे. निवडणूक आयोगाने मागेच सर्व राजकीय पक्षांना मतदान यंत्रात छेडछाड करण्याचे आव्हान केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व काही छोटे पक्ष त्यात सामील झाले होते. त्याचवेळी हे मतदान यंत्र हॅक होऊ शकत नाही हे सिद्ध झालेले आहे. आता पुन्हा या पक्षांचे रडगाणे सुरू झालेले आहे. ही यंत्रे कडक तपासणीतून सिल बंद केली जातात. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीं समक्ष मग ही मोजणीसाठी उघडली जातात. लोकांमध्ये यंत्रांबाबत उगाचच अविश्‍वास पसरविण्याची ही विरोधकांची खेळी आहे.

दुसरे म्हणजे अलीकडेच तीन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला होता. त्या वेळी कोणत्याही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी वा त्यांच्या उमेदवारांनाही मतदान यंत्राबाबत आक्षेप घेतले नव्हते. म्हणजे आपला पराभव वाटत असेल किंवा पराभव झाला असेल तर सरळ यंत्रावर खापर फोडायचे. आपला विजय झाल्यास सर्व बरोबर आहे असे हे कपटी धोरण आहे. एकूणच राजकीय नेत्यांनी मतदान यंत्र स्वतः समजून घेणे आवश्‍यक आहे. एकीकडे विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक गोष्टी हव्यात; पण दुसरीकडे पुन्हा मतपेट्या वापरल्या जाव्या असा आग्रह धरणे योग्य आहे का?

मी : नाही, आपण म्हणता ते बरोबरच आहे.

विसरभोळे : उगाच मी म्हणतोय म्हणून नाही तुम्हीही जरा नीट विचार करा. आता एकवीस नेते एकाच वेळी दिल्लीत पोहोचले म्हणजे बहुतेक सर्व चार्टर विमानानेच आलेले असणार. विमान ही विज्ञानाचा आविष्कार आहे. चेन्नईमधील माणूस दोन तासांत दिल्लीत पोहचू शकतो. चार पाचशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात जुने बुजुर्ग लोक काशीला जायचे. कित्येक वेळा काशीला गेला तो गेलाच, असे होण्याचे कारण एकतर खडतर प्रवास, खाणे पिणे, संपर्काचा अभाव.
नातेवाईक बुजुर्गांच्या पाया पडत. कारण न जाणो पुन्हा ही व्यक्‍ती परत येईल की नाही. आता सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मतदान पेट्या पुन्हा हव्या तसेच हे इव्हीएम नको असे म्हणत असतानाच हे लोक स्वतः हातात लाख रुपयांचा मोबाइल हॅंडसेट वापरत आहेत. सर्व ऑनलाइन सुविधा घेत आहेत. स्वत:च्या इतर विविध उद्योगांचे संगणकीकरण करीत आहेत. अद्ययावत टेक्‍नॉलॉजीचा पुरेपूर फायदा घेत आहेत पण इव्हीएम मात्र खराब आहे असा कांगावा करीत आहेत आणि असे फक्‍त निर्ढावलेले व ढोंगी राजकीय नेतेच करू शकतात. बरं हे सारे त्यांना माहीत नाही असे नाही. पण निवडणुका चालू आहेत ना? काहीतरी स्टंटबाजीने लोकांचे लक्ष वेधून घेणे गरजेचे आहे म्हणूनच हा अपप्रचार, बाकी काही नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)