नगर -आता सण-उत्सवांचा काळ सुरू होणार आहे. या काळात खाद्य पदार्थांना जास्त मागणी असते. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. खाद्यतेलातील घातक पदार्थाचे (पोलर कंपाऊंड) प्रमाण टीपीसी मशिनद्वारे 25 टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास संबंधित व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न- औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिला.
व्यावसायिकांनी खाद्यतेलाचा वारंवार पुर्नवापर करू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे. उपाहारगृहे, फेरीवाले व इतर लहान-मोठे व्यावसायिक तयार अन्नपदार्थांची विक्री करतात. खाद्यतेलाच्या वारंवार पुर्नवापरामुळे त्यामधील पोषक मूल्य कमी होऊन घातक पदार्थांचे प्रमाण वाढते. या पदार्थांमुळे घशाचे आजार, कोलेस्टेरॉल वाढणे यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात.
देशभरात 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 या एकच अन्नविषयक कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्याच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जिल्हापातळीवर शिबीर, कार्यशाळा, प्रभातफेरी, व्यसनमुक्ती शपथ, कमी तेल-कमी मीठ कमी साखर याबाबत जनजागृती फलक माध्यमांचा वापर केला जात आहे. परवानाधारक व नोंदणीधारक आस्थापनांनी, अन्न व्यावसायिकांनी (अन्न उत्पादक, वितरक, घाउक, किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक इत्यादी) विक्री बिलावर एफएसएसएआय अंतर्गत घेतलेला परवाना/नोंदणी प्रमाणपत्र याचा क्रमांक नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे.
दरम्यान, सण उत्सवांच्या काळात अन्न औषध प्रशासनाकडून नियमितपणे कारवाई मोहीम हाती घेण्यात येते. याआधीही गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळीही पथकाने खाद्यतेलांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर आता विभागाने खाद्यतेल तपासणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी अन्न पदार्थ तयार करणारे व्यावसायिक कोणत्या प्रकारचे तेल वापरतात, याची माहिती याद्वारे समोर येईल.
मोबाइल नंबर अपडेट करा
याआधी परवाना/नोंदणी घेतले आहेत. अशा व्यावसायिकांनी अर्जामध्ये स्वतःचा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी दिला नसेल तर, अथवा काही ऑनलाइन सुविधा केंद्रांतून अर्ज करतानाचा युजर आयडी व पासवर्ड अन्न व्यावसायिकांनी स्वत:चा दिला नसेल तर अशा व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून स्वतःचा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट करुन घ्यावेत. यापुढे सर्व अन्न आस्थापनेच्या तपासण्या या ऑनलाइन केल्या जाणार असून फसवणूक व इतर गैरप्रकार टाळण्यासाठी हे आवश्यक आहे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.