चेन्नई :- अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी तामिळनाडूचे वीज विभागाचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि इतर काहीं जणांच्या ठिकाणावर मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून छापे टाकले. चेन्नई आणि करूर येथील सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.
सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पोलीस आणि ईडीला बालाजी यांच्यावरील कारवाईला अनुमती दिली होती. त्यांच्या विरोधात नोकरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप आहे व त्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सेंथिल बालाजी यांच्या विरोधात मनि लॉंड्रिंग विरोधी कायद्यानुसार कारवाई केली जात आहे.
गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सेंथिल बालाजी यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. हा राजकीय सूड नाट्याचा भाग आहे असा आरोप सत्तारूढ द्रमुक पक्षाने केला आहे.