Pune – ईडीने महादेव ॲप कंपनीची उपकंपनी असलेल्या लोटस ३६५ नावाच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील ठिकाणांवर छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून मंगळवारी आणि बुधवारी महादेव ॲपशी जोडलेल्या पॅनल ऑपरेटर्सची झडती घेण्यात आली.
या कारवाईत अंदाजे १.२ कोटी रुपये रोख, कागदपत्रे, युपीआई आयडी, अकाउंट बुक्स आणि बेटिंग आयडीशी संबंधित इतर डिजिटल पुरावे ईडीजे जप्त केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पॅनेल ऑपरेटर आणि संबंधित सहयोगींचे जबाबही नोंदवले.
अलीकडेच, ईडीने भोपाळमधून हवाला ऑपरेटर गिरीश तलरेजा नावाच्या आरोपीला अटक केली. तलरेजा लोटस ३६५ कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असून आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि सुभम सोनी यांचा जवळचा सहकारी होता.
तलरेजाच्या ईडीने केलेल्या चौकशीत प्रकरणाशी सबंधित धागेदोरे मिळाले आहे. तलरेजा महादेव ॲप कंपनीच्या ऑनलाइन बुकच्या सर्वोच्च स्थानावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे.
सोबतच त्याने अनेक शेल कंपन्या आणि हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून सट्टेबाजीच्या निधीतून नफा ॲपच्या दुबई कार्यालयाच्या खात्यात वळवला. महादेव ॲपचे अनेक सहयोगी, प्रवर्तक आणि त्याच्या उपकंपनीच्या पॅनेल ऑपरेटर्ससह, सट्टेबाजीच्या पैशाची लाँड्रिंग करण्यासाठी तलरेजा यांच्या संपर्कात होते. आरोपी तलरेजाचा ५०० कोटींहून अधिक रुपयांच्या व्यवहारात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.व