जालना – राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार शिवसेनेतील बंडखोरीमुळे अडचणीत आलेले असताना दुसरीकडे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली. जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट 2019 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून पीएमएलएने अंतर्गत तपास सुरू आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्ट 2019 च्या आदेशानुसार नोंदविण्यात आला होता.
ईडीने दोन महिन्यांपूर्वी साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश दिले होते. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच काही महिन्यांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. रामनगर साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणीत अर्जुन खोतकर यांची ईडी चौकशी करत आहे. आज ईडीने कारखान्याची जमीन जप्त केली.