इतर कंपन्यांनाही वापर कमी करण्याची सूचना
पुणे – ई-कॉमर्स कंपन्यांचे काम आणि उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कंपन्या पॅकेजिंग करताना मोठ्या प्रमाणात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर करतात. हा वापर या कंपन्यांनी हळूहळू कमी करावा, अशा सूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या कंपन्यांना दिल्या आहेत.
त्याचबरोबर या कंपन्यांनी पॅकेजिंगसाठी पर्यायी उत्पादनांचा विकास करण्यावर भर द्यावा. या कंपन्या आपल्या ई-कॉमर्स व्यासपीठावरून मालाचा पुरवठा करताना, त्याचे पॅकेजिंग करताना प्लॅस्टिकचा वापर करतात. भारत सरकारने आणि सर्व राज्य सरकारनी प्लॅस्टीकचा वापर कमी करण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे या कंपन्यांनी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, असे सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात फ्लिपकार्ट कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रजनिश कुमार यांनी सांगितले, आम्ही सध्या पॅकेजिंगसाठी केवळ 7 टक्के इतक्या प्लॅस्टिकचा वापर करतो. जून महिन्यापर्यंत आम्ही पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे कमी करणार आहोत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आम्ही सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर करणे कमी केले आहे. जून महिन्यापर्यंत आम्ही आमचे पूर्ण उद्दिष्ट साध्य करू.