भारत पुढचे युद्ध स्वदेशी शस्त्रास्त्रांनी करून जिंकेल

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्‍त केला विश्‍वास

नवी दिल्ली : भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी नुकतेच भारताला पहिले राफेल विमान मिळाले. परंतू, या सर्वात आता लष्करात स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसीत शस्त्रांस्त्रा समावेश करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यातच सैन्य दलांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन त्याचा सैन्यात समावेश करण्याला लष्करप्रमुख बीपिन रावत यांनी स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. भारत पुढचे युद्ध स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांनी करून विजय मिळवेल असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्‍त केला. तसेच भविष्यातले युद्ध कसे असेल त्यावर लक्ष देण्याची वेळ आता आली आहे असे बीपिन रावत म्हणाले.

आम्ही भविष्यातील लढाईची सिस्टिम कशी असेल त्याकडे पाहत आहोत. सायबर, अवकाश, लेझर, इलेक्‍ट्रॉनिक आणि यंत्रमानव टेक्‍नोलॉजी विकसित करण्याकडे आपल्याला लक्ष दिले पाहिजे असे रावत यांनी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 41 व्या डीआरडीओच्या संचालकांच्या परिषदेत म्हणाले. सैन्य दलाची गरज लक्षात घेऊन स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल लष्करप्रमुखांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे कौतुक केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत एनएसए अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. शत्रूपेक्षा आपण वरचढ कसे ठरु त्यादृष्टीने आपण आपले विश्‍लेषण केले पाहिजे असे एनएसए अजित डोवाल म्हणाले. टेक्‍नोलॉजी आणि पैसा हे जागतिक राजकारणाला आकार देणारे दोन फॅक्‍टर त्यांनी लक्षात आणून दिले. या दोन विभागात देशाची ताकत किती आहे त्यावर विजयाचे गणित ठरेल. टेक्‍नोलॉजी सर्वात जास्त महत्वाची आहे असे डोवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.