पिंपरी -करोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आहेत. याचा थेट फटका शहरातील ढोल पथकांना बसला आहे. निर्बंधांमुळे वादनाचा सराव तर बंदच आहे; मात्र, आर्थिक उलाढालच ठप्प झाल्याने पथकांची संख्या 40 वरुन 30 वर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातील सुमारे दोन कोटींच्या आर्थिक उलाढालीला “ब्रेक’ लागला आहे.
डीजेच्या दणदणाटाला बंदी असल्याने अस्सल ग्रामीण बाज असलेल्या ढोल पथकांना गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील गणेश मंडळांकडून चांगली मागणी होती. गणेशोत्सवाच्या काळातील शेवटच्या पाच दिवसांच्या कालावधीत या पथकांना मागणी वाढत असते. एका पथकात 70 ते 80 वादक व सहाय्यकांचा समावेश असतो. तर या पथकाची सुपारी 50 हजारांपासून सुरु होते.
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक पथकाची साधारणपणे पाच ते दहा लाखांची उलाढाल होते. मात्र, वादकांचा प्रवास, जेवण, साहित्याची तुटफूट या बाबींसाठी मोठा खर्च होत असतो. तरीदेखील शहरातील अनेक ढोल पथकांनी चांगली कामगिरी बजावली आहे.
पुण्याच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातदेखील गणेशोत्सवाच्या काळात प्रतिष्ठापणा व विसर्जन मिरवणुकीकरिता ढोल पथकांची मागणी वाढली होती.
पुण्यातील ढोल पथकांच्या धर्तीवर गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडसह देहुरोड व तळेगाव या परिसरात एकूण 40 ढोल पथके स्थापन झाली आहेत. करोनाकाळात अनेक पथकांनी आपले वादक गमावले आहेत. तर अनेकांनी जवळचे आप्तस्वकीय गमावल्याने ढोल पथकांमध्ये फारसे उत्साही वातावरण नाही. त्यातच सरावालादेखील बंदी असल्याने अनेकांनी उपजिवीकेसाठी कंपन्या व खासगी आस्थापनांची वाट धरली आहे.
गेली दीड वर्षापासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदा सलग दुसऱ्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. यामध्ये गणरायाची मिरवणुकादेखील काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी दोन महिने आगोदरच सुरु होणारा ढोल पथकांचा सराव बंद आहे.
त्यामुळे चिंचवड, पिंपरी, मोशी याठिकाणच्या नदीकाठी चालणाऱ्या वादनाच्या सरावात सलग दुसऱ्यावर्षी खंड पडला आहे. तर ढोलाच्या चामड्याच्या पानाचे आयुर्मान कमी असल्याने दीड वर्षे विनावापर पडून राहिलेली लाखो रुपये किंमतीची शेकडो पाने खराब झाली आहेत. ती फेकुन देण्याशिवाय ढोल पथकांपुढे पर्याय उरलेला नाही.
करोनामुळे अनेक संकटांचा सामना शहरातील ढोल पथकांना करावा लागत आहे. गणेशोत्सव साजरा करण्यावरच मर्यादा असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. मात्र, तरी देखील पुढील वर्षी परिस्थिती पूर्वपदावर येईल. मिरवणुकांवरील निर्बंध शिथिल केले जातील, अशी आम्हाला आशा आहे.
– विशाल मानकर, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड ढोल पथक महासंघ