मुंबई – अभिनेता अरमान कोहली याच्या अंधेरी येथील निवासस्थानी कोकेन हा अमली पदार्थ सापडल्याने त्याला रविवारी अटक करण्यात आली. अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईबरोबरच आणखी काही बड्या हस्ती या प्रकरणात जाळ्यात सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
एनसीबीने कोहलीच्या घराची शनिवारी सायंकाळी झडती घेतली.त्यात बंदी असणारे नशिली पदार्थ सापडल्याने त्याला चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले.
कोहलीच्या घरात सापडलेले कोकेन हे दक्षिण अमेरिकेत उत्पादित केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असे अतापर्यंत केलेल्या तपासात आढळून आले आहे. अमेरिकेतून हे कोकेन मुंबईपर्यंत कसे आणले त्या मार्गाचा आणि त्यातील संबंधितांचा तपास एनसीबी मुंबई करत आहे. त्यात याची वाहतूक करणाऱ्यांचाही शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास सुरू असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एनसीबीने शनिवारी सकाळी अजय राजू सिंग या ड्रग पेडलरला ( अमली पदार्थ विक्रेता) अटक केली. त्याच्या चौकशीत अरमान कोहलीचे नाव समोर आले. सिंगला हाजी अली दर्गाह जवळ अटक करण्यात आली. त्याच्याकडे त्यावेळी 25 ग्रॅम एमडी सापडले. त्याच्यावर यापुर्वीही अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. 2018 मध्ये इफेड्रीनचा मोठा साठा जप्त केला होता. त्याप्रकरणात तो आरोपी होता.
कोहली आणि सिंह यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले असून या प्रकरणात आणखी काही बड्या हस्ती जाळ्यात सापडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.