तळेगाव ढमढेरे येथील प्रकार ः आरोग्य खात्याने लक्ष देण्याची गरज
तळेगाव ढमढेरे- प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाहेरील मेडिक लमधून औषधे खरेदी करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. या समस्येकडे जिल्हा आरोग्य खात्याने लक्ष देण्याची गरज आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे परिसरातून उपचार घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, गर्भवती महिला, सर्वसामान्य रुग्ण येत असतात. त्यांना आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेतल्यानंतर औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर बाहेरील मेडिकलमधून अणण्यास सांगतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयात वारंवार औषधांचा तुटवडा असल्याचे सांगूनही तालुका वैद्यकीय अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचे दिसून येत आहे.
औषध साठा फक्त अंदाजे 10 टक्के उपलब्ध आहे. शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालय सोडून रुग्ण तळेगाव ढमढेरे या ठिकाणी येऊन उपचार घेत असतात. क्ष किरण छायाचित्रे, शस्त्रक्रिया यासह अनेक दवाखान्यात उपलब्ध नसलेल्या सेवेची मागणी रुग्ण करतात. पण याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच आरोग्य कर्मचारी, अधिकारी कमी पडत आहे. औषधे अपुऱ्या प्रमाणात आहेत. परिणामी रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने त्यांना खासगी दवाखान्यांकडे जावे लागत आहे. याकरिता जिल्हा आरोग्य खात्याने तात्काळ औषध उपलब्ध करून रुग्णांना हवी ती सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.