पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.15) गुन्ह्यातील पाच आरोपींवर आरोप निश्चिती झाली. डॉ. विरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे आणि ऍड. संजीव पुनाळेकर यांच्यावर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात ही आरोप निश्चिती झाली. त्यामुळे आता खटला लवकर सुरू होण्यास मार्ग मोकळा झाला आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यामध्ये विरेंद्रसिंह तावडे येरवडा कारागृहातून, शरद कळसकर आर्थररोड कारागृहातून, सचिन अंदुरे औरंगाबाद कारागृहातून उपस्थित होते. तर याप्रकरणात जामीन मिळालेले ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे न्यायालयात उपस्थित होते. सर्वांना आरोप कबूल आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
सुनावणी दरम्यान आरोपींनी गुन्हा निश्चित करण्यास वेळ मागितला. परंतु न्यायालयाने आरोप निश्चिती करण्यास मुदतवाढ देता येणार नसल्याचे स्पष्ट करून गुन्हा कबूल नसल्याबाबत आरोपींचा जबाब नोंदविला. या प्रकरणात संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तर इतरांवर खून तसेच यूएपीएच्या कायद्यानुसार आरोप निश्चित करण्यात आले. या केसबाबत सरकारी पक्षातर्फे आवश्यक कागदपत्रे, पुरावे सादर केल्यानंतर प्रत्यक्ष या केसची सुनावणी होणार असून, पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होईल.