‘लसीबाबत राजकारण नसून देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्रालाच’

मुंबई –  लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा तुटवडा असून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकार विनाकारण राजकारण करत असल्याची टीका केली होती. या सर्वानंतर मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारने सुरुवातीपासून महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या आरोपांवर हर्षवर्धन यांनी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतांना देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला  दिल्याचे स्पष्ट केले आहे.  ते पुढे म्हणाले, ‘देशातल्या अनेक राज्याकडून लसीकरण केंद्रावर लस संपल्याचं सांगितलं जात आहे. लस आणि लसीकरण यांचे नियोजन योग्य पद्धतीने करायला हवे,  केंद्र राज्य सरकारला लस पुरवठा करते. त्यानंतर लसीकरण केंद्रापर्यंत लस घेऊन जाणं राज्य सरकारची जबाबदारी आहे. निर्धारित वेळेत लसीचे डोस लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाणं हे राज्य सरकारचं काम आहे. यात जर कुठल्या राज्याने नियोजन केलेलं नसेल आणि लसीचे डोस खराब होत असतील, तर ते राज्य सरकारचं अपयश आहे. लस वितरणात कोणतंही राजकारण केलं जात नाहीये.  

दरम्यान,एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे तर दुसरीकडे देशासमोर नवे संकट उभे राहिले आहे. कोरोना लसींच्या तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्राकडे सातत्याने कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा वाद रंगताना दिसतोय. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केंद्राला कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगण, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने आता लसीकरण मोहीम थांबवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.