पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका हद्दीतील विविध दिव्यांग योजनांचा लाभ घेणार्या दिव्यांग व्यक्तीच्या ‘हयात दाखल्या’बाबत त्यांचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करण्यात आले असून 6699 दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्यामध्ये बदल दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयामध्ये न येता त्यांच्या दाखल्यामध्ये मनपा प्रशासनाकडून ‘घरोघरी’ जाऊन नोंदणी करण्यात आली. दिव्यांगाच्या हयातीच्या दाखल्याचे घरोघरी जाऊन समक्ष सर्वेक्षण करणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
सर्वेक्षणामध्ये व्यक्तीच्या माहितीची नोंदणी करताना अक्षांश व रेखांश (जिओ टँगिग)ही घेतल्याने भविष्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना मदत पोहोचविणे सोयीचे होणार आहे. सर्वेक्षणामध्ये दिव्यांगाची केवायसी पूर्ण करताना त्यांचे फेस रीडिंग थम्ब इम्प्रेशन, आयरिस स्कॅन व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संकलित करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना त्यांची केवायसी पूर्ण झाल्यानंतर हयातीचा दाखला देण्यात आला. सर्वेक्षणामुळे आता दिव्यांगाचा हयातीचा दाखला तत्काळ मिळण्यासाठी मदत होत आहे.
सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरामध्ये 6,699 मधील 5,232 जणांकडे म्हणजेच 78 टक्के दिव्यांगांकडे यूडीआयडी सर्टीफिकेट असून 1467 म्हणजेच 22 टक्के दिव्यांगांकडे हयातीचा दाखला नसल्याचे निदर्शनास आले; परंतु सर्वेक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आता 1,467 जणांचा हयातीचा दाखला काढण्यासाठी मदत होणार आहे.
4,540 इतके दिव्यांग पुरुष तर 2159 इतक्या दिव्यांग महिला आहेत. याचबरोबर, सर्वेक्षणाच्या माध्यमातून वय-वर्षे 25 ते 60 यामध्ये दिव्यांगाची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे.
1,470 दिव्यांगांना माहिती अपडेट करण्याचे आवाहन
सर्वेक्षणा दरम्यान 1,470 दिव्यांग नागरिकांचे पत्ते व माहिती अपुरी असल्याने सदर नागरिकांपर्यंत पोहोचणे अधिकार्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे येत्या काळात सदर दिव्यांग नागरिकांनी आपला पत्ता व अपुरी माहिती केवायसी सर्वेक्षणाकरिता 8459834929 या क्रमांकावर फोन करून अपडेट करावी, असे आवाहन महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून करण्यात आलेले आहे.
या सर्वेक्षणामुळे भविष्यात दिव्यांगांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नसून, त्यांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यात आली आहे. यामुळेच आता दिव्यांगांना हयातीचा दाखला मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसून त्यांना कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
दिव्यांगांना दाखल्यासाठी कार्यालयात न येता त्यांना सर्वेक्षणाच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करून हयातीचा दाखला मिळालेला आहे. सर्वेक्षणातून माहितीचे डिजिटलाइजेशन झाले असून दिव्यांगांना दाखल्यासाठी आता कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. – श्रीनिवास दांगटसहाय्यक आयुक्त, समाजविकास विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका