वॉशिंग्टन – कोणत्याही देशाकडून 5जी तंत्रज्ञान घेण्यापूर्वी ते तंत्रज्ञान घेतल्यानंतर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा विचार करा, असा इशारा अमेरिकेने जगातील देशांना दिला आहे. यात अमेरिकेने चीनचे प्रत्यक्ष नाव घेत हा इशारा दिला नसला तरी चीनची बलाढ्य कंपनी हुआवीला उद्देशूनच हा इशारा दिल्याचे स्पष्ट आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने मे महिन्यात एक आदेश काढून हुआवी आणि तिच्याशी संबंधित अन्य 68 कंपन्यांना सुटे भाग व तंत्रज्ञान विकण्यास अमेरिकी कंपन्यांवर बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात येत असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते. हुआवीच्या 5जी तंत्रज्ञानावर मर्यादा अथवा बंदी घालण्याची विनंती अमेरिकेकडून भारतासह अनेक देशांना करण्यात येत आहे.
5जी तंत्रज्ञानाचा वापर चीनकडून हेरगिरीसाठी केला जाऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. हुआवीने मात्र आपल्या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका नसल्याचे म्हटले आहे.