पक्षांतरासाठी शिवसेनेकडून वारंवार फोन: विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवरही साधला निशाणा

चंद्रपूर – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात दररोज नवनवीन घडामोडी घडून येत आहेत. त्यातच शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत असल्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. एक विरोधीपक्ष नेता भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधीपक्ष नेत्याला शिवसेनेला न्यायचा आहे. वांद्रे येथून आतापर्यंत 25 फोन आले. ते भेटायला बोलावत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही काम केले नसल्याने त्यांना यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ आली आहे. या सरकारने वारंवार खोटी आश्‍वासने देवून जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे.

भाजपने 2014च्या निवडणूक प्रचारात वारेमाप आश्वासने दिल्यामुळे जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून सत्ता दिली, परंतु पाच वर्षात त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला त्याचाच परिणाम म्हणून पाच वर्षात तब्बल 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. “मुद्रा योजनेतून लाखो रोजगार निर्माण झाल्याचा सरकारचा दावाही फसवाच निघाला आहे.

नोकरीची आशा लावून बसलेल्या बेरोजगारांच्या स्वप्नांची राखरांगोळी सरकारने केली. पाच वर्षात राज्यात मोठ्या उद्योगाची उभारणी झालेली नाही. नागपूरच्या मिहानमध्ये सत्यम, विप्रो, एल अँड टी, व इतर आयटी कंपन्या आल्या पण रोजगार निर्मिती झाली नाही. पतंजली फूड पार्कसाठी 230 एकर जमीन देण्यात आली पण प्रकल्प अद्याप उभा राहिला नाही आणि रोजगारही निर्माण झाला नाही. राज्यातील वाहन उद्योगालाही सरकारच्या धोरणांमुळे घरघर लागली आहे. औरंगाबाद एमआयडीसीमधील वाहन उद्योगांना सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन बंद केल्यामुळे लाखभर कामगार बेरोजगार झाले. वाहन विक्रीची 250 शोरुम्स बंद करावी लागल्याने तिथले कामगारही बेरोजगार झाले, असे वडेट्टीवार म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.