मंचर -करोनाच्या नावाखाली प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे व छोट्या-मोठ्या कामांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या बाबी टाळण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी करोनाची कामे करताना
आठवड्यातील दोन दिवस पूर्ण वेळ आपल्या कार्यालयात बसावे व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविताना कार्यालयीन कामे व कर्तव्ये पार पाडावित, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या.
मंचर-अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती संजय गवारी,
प्रांतअधिकारी सारंग कोडोलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक निरीक्षक लहु थाटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, डॉ. अंबादास देवमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, घोडेगांव ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. करोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवा. करोनाचे रुग्ण अधिक सापडलेल्या गावांमध्ये लसीकरणाला प्राधान्य द्यावे. लसीकरण करताना आदिवासी भागाकडे विशेष लक्ष द्यावे.
आंबेगाव तालुक्याप्रमाणे जुन्नर, खेड व शिरुर तालुक्यातील करोना रुग्णांना अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळे आंबेगावप्रमाणेच जिल्हा परिषद प्रशासनाने जुन्नर, खेड व शिरुर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी शिवनेरी जम्बो कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून द्यावेत,
अशी मागणी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. कंपनी सीएसआर फंडातून खासगी पद्धतीने लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केली.
प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात व घरातील प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करण्याचे नियोजन करा. ज्या कुटुंबातील एखादा व्यक्ती चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली. तर त्याच्या संपर्कातील सर्व लोकांची तपासणी करा.
जोपर्यंत गाव करोनामुक्त होत नाही तोपर्यंत वार्डनुसार करोना चाचण्या करा. तालुक्यात मोठ्या प्रमाणात करोना तपासण्या करा. चाचणीमध्ये करोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्व रुग्णांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करा. त्यांच्यावर तात्काळ उपचार करा.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे