पुणे – मुंबईत झालेल्या जोरदार पावसाचा फटका मुंबईतील उपनगरीय रेल्वेसह इंटरसिटी आणि लांबपल्ल्याच्या रेल्वेला बसला आहे. पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या देखील चार रेल्वे रद्द केल्या. तर लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेची सेवा अंशत: खंडित केली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
शनिवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. विविध रेल्वेमार्गांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अनेक रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून माघारी फिरावे लागले.
पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्यांच्या दोन्ही बाजूंच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मुंबईहून कोल्हापूरला जाणारी कोयना एक्स्प्रेस रद्द केली होती. यासह सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस, पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, हुबळी-मुंबई एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावल्या. काही लांब पल्ल्यांच्या रेल्वेतील प्रवाशांना दोन ट्रेन बदलत मुंबई गाठावी लागली.