अकरावी प्रवेशाचा बिगुल!; वेळापत्रक चार दिवसात होणार जाहीर

पुणे – सन 2021-22 शैक्षणिक वर्षाच्या अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या चार दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी मार्गदर्शक पुस्तिकाही पोर्टलवर ऑनलाइनच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी हालचाली सुरू कराव्या लागणार आहेत.

राज्यात दरवर्षी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या सहा महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश पद्धतीचा अवलंब केला जातो. मागील वर्षी 29 जुलैला दहावीचा निकाल लागला होता. दरम्यान, दि.1 जुलै रोजी अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर पधंरा दिवसांनी पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. मागील वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले होते. मागील वर्षी 5 लाख 59 हजार 344 एवढा प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 4 लाख 49 हजार 55 अर्ज दाखल झाले होते. 3 लाख 78 हजार 861 जागांवर प्रत्यक्ष प्रवेश झाले तर 1 लाख 80 हजार 483 प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या होत्या.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल करून ते 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून 21 ऑगस्टच्या सुमारास “सीईटी’ घेण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन केले आहे. प्रवेशासाठी येत्या 26 जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालयांची ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1 भरता येणार आहे.

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आधी कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेशासाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती असलेला प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. “सीईटी’चा निकाल लागल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया झाल्यावर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. – दिनकर टेमकर, प्रभारी संचालक, उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.