Donald Trump Election Ban : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांना आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरता येणार नाही. याविषयीचा महत्वपूर्ण निकाल अमेरिकेच्या न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक बंडाच्या कलमाचा हवाला देत डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभाग घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय दिला आहे. ट्रम्प हे अपात्र उमेदवार असल्याचे असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. चार न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्यापैकी 3 न्यायाधीश ट्रम्प यांच्या उमेदवारीच्या विरोधात होते. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करू शकतात.
अध्यक्षीय निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी यूएस राज्यघटनेच्या 14 व्या दुरुस्तीच्या कलम 3 चा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांमधून ट्रम्प यांचे नाव वगळण्याचे आदेश न्यायालयाने परराष्ट्र सचिवांना दिले आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेच्या चौदाव्या घटनादुरुस्तीच्या कलम ३ नुसार ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर राहू शकत नाहीत, हे न्यायालयाने मान्य केले आहे. हा आदेश फक्त कोलोरॅडो राज्यात लागू होणार असला तरी या निर्णयावर अपील करणे बाकी असल्याने पुढील महिन्याच्या 4 तारखेपर्यंत निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, “आम्ही या निर्णयावर सर्व विचारांती पोहोचलो नाही. आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरे काय आहेत हे आम्हाला माहीत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या आमच्या कर्तव्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही निर्णय देत आहोत. आमच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया येईल याची आम्हाला पर्वा नाही, आम्ही फक्त कायदा डोळ्यासमोर ठेवून करत आहोत.”असे न्यायालयाने म्हटले.
कॅपिटल हिल हिंसाचाराच्या संदर्भात ट्रम्प यांच्या विरोधात न्यायालयात सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये त्यांना निवडणुकीत भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर कॅपिटल हिलवर हल्ला झाला. त्यानंतर ट्रम्प यांचे समर्थक कॅपिटल हिलवर चढले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे. ट्रम्प यांच्या विरोधी पक्षाने आरोप केला की, ट्रम्प हिंसाचारास जबाबदार आहेत कारण ते निवडणूक निकालानंतर अनेकदा जाहीरपणे सांगत होते की निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला.