पणजी – पक्षामध्ये निष्ठा आणि चारित्र्य यांना काही किंमत आहे की नाही असा उद्विग्न सवाल गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पूत्र उत्पल यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारण्याचे संकेत दिल्यानंतर उत्पल बोलत होते.
माझ्या वडिलांसोबत काम करणारे पणजी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सध्या माझ्या प्रचाराला पाठींबा देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एखादी व्यक्ती नेत्याचा मुलगा आहे म्हणून त्याला उमेदवारी मिळणार नाही, असे फडणवीस अलीकडेच म्हणाले होते. पणजी विधानसभेसाठी उमेदवारी मागणाऱ्या उत्पल पर्रीकर यांच्याकडे त्यांचा रोख होता. सध्या येथे काँग्रेस मधून भाजपात आलेले आतांसीओ मोंसेरेटे हे भाजपाचे आमदार आहेत.
मी पक्षाचा एक लहान कार्यकर्ता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ज्येष्ठ नेते जे काही बोलतात त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. पण नेत्याचा मुलगा म्हणून मला उमेदवारी मागायची असती तर ती मी माझया वडिलांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत मागितली असती, असे ते म्हणाले.
पणजी मतदार संघात मी मतदारांना भेटणे सुरूच ठेवणार आहे. 1994 पासून माझया वडिलांसोबत असणारे भाजपा नेते आज माझ्याच सोबत आहेत, असे स्पष्ट करून त्यांनी सवाल केला की कै मनोहर पर्रीकर जेथून विजयी झाले तेथे तुम्ही गुन्हेगारी पार्श्व भूमी असणाऱ्याला उमेदवारी देणार का? हे केवळ पणजीतच सुरू आहे असे नव्हे तर संपूर्ण गोंव्यातील राजकीय स्थिती अस्वीकारार्ह आहे, असेही ते म्हणाले.