नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Modi) आपण ओबीसी असल्याचे सांगत असले तरी जातनिहाय जनगणना झाली तर त्यांची खरी जात उघड होईल या भीतीने मोदी सरकार (Modi Sarkar) जातनिहाय जनगणना करण्याची टाळाटाळ करीत आहे असा आरोप बिहार मधील सत्तारूढ जेडीयु पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे. मोदी यांची जात मोध घांची अशी असून ती जात ओबीसी प्रवर्गात मोडत नाही असा दावाही त्या पक्षाने केला आहे.
जेडीयू (JDU) मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते नीरज कुमार (Neeraj Kumar) म्हणाले की, मोदींची जात मोध घांची अशी आहे आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी स्वताच आपल्या जातीचा समावेश सन 2002 साली ओबीसींच्या यादीत केला. हा समावेश 1994 मध्ये तत्कलिन कॉंग्रेस (Congress) सरकारने केल्याचा दावा मोदींनी केला होता, पण तो खोटा आहे. नीरजकुमार यांनी सन 1994 चे राजपत्र पत्रकार परिषदेत सादर केले. त्यात मोध घांची ही जात ओबीसींमध्ये समाविष्ट नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही कागदपत्रेही सादर केली. नीरजकुमार म्हणाले की, घांची जातीचे सहा उपसमूह आहेत. त्यापैकी फक्त एक, घांची (मुस्लिम), 1994 मध्ये ओबीसींच्या यादीत होता. नरेंद्र मोदी यांच्या जातीचा समुह त्यावेळी ओबीसी यादीत नव्हता असे कुमार म्हणाले, हा दावा खोडून दाखवा असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. केवळ निवडणुकीतील लाभासाठी मोदींनी स्वताच आपल्या मोध घांची जातीचा समावेश ओबीसी यादीत केला आहे असे ते म्हणाले.
1931 च्या जनगणनेनुसार पंतप्रधानांच्या जातीचा साक्षरता दर ब्राह्मणांच्या बरोबरीने आणि राजपूतांपेक्षा जास्त होता आणि त्यामुळे त्यांना ओबीसीं (OBC) यादीच्या बाहेर ठेवले गेले असेही ते म्हणाले. 19व्या शतकाच्या सुरुवातीस मोध घांची समुदायाने ब्रिटिश सरकारकडे अशीही कागदपत्रे सादर केली आहेत. की त्यांनी आपल्या जातीचा समावेश वैश्यांमध्ये करावा असे म्हटले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोदींनी आपल्या जातीसाठी ज्या खोट्या गोष्टींचा आधार घेतला आहे, तो उघडकीस येऊ शकतो या भीतीने केंद्र सरकार जात जनगणना करण्यात अडथळे आणत आहे असे कुमार म्हणाले.