बंगळूर -कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांमागे विविध यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अशातच त्या पक्षाचे कर्नाटकमधील संकटमोचक अशी ओळख असणारे माजी मंत्री डी.के.शिवकुमार सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. त्यांना ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी हजर राहण्यास सांगितले आहे.
शिवकुमार यांना शुक्रवारी दुपारीच ईडीच्या दिल्लीतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कौटूंबिक आणि व्यक्तिगत कारणे पुढे करत त्यांनी दिल्लीला जाण्याचे टाळले. अर्थात, ईडीच्या समन्सचा आदर ठेऊन मी नक्की दिल्लीला जाईन. त्याआधी स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि कारस्थानाला प्रत्युत्तर देण्यासाठी कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक पर्यायांचा वापर करण्याचे सूतोवाच त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. करचुकवेगिरी आणि हवाला व्यवहारांच्या आरोपावरून ईडीने त्यांच्या विरोधात याआधीच गुन्हा दाखल केला आहे.
राज्यसभेच्या 2017 मधील निवडणुकीवेळी कॉंग्रेसच्या गुजरातमधील आमदारांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून कर्नाटकमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. आमदार फोडण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने ते पाऊल उचलले. त्यावेळी गुजरातमधील आमदारांच्या मुक्कामाची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर सोपवण्यात आली होती. ती भूमिका निभावल्यानेच ईडी आणि प्राप्तिकर विभागाचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला. मी कुठलेही पाप केले नाही. लाच घेतलेली नाही. कुणाचा खून केला नाही की बलात्कार केलेला नाही. मी प्रामाणिकपणे माझा व्यवसाय करतो. माझा परदेशात कुठला व्यवहार नाही. सरकारची फसवणूक मी केली नाही. मी नियमितपणे कर भरतो, अशी भूमिका मांडत त्यांनी ईडीला सहकार्य करण्याची ग्वाही दिली.