पुणे – महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीची बैठक बोलवली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ऑनलाइन होणार असून, या बैठकीत हा आयोग लागू केला जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि मंत्रालयातील अधिकारी उपस्थित असतील.
कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र, शासनाने अद्याप त्यास मान्यता दिलेली नाही. तर, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह, सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्याबाबत राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तर, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींकडूनही शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. हा वेतन आयोग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे.