- वल्लभनगर आगाराचे उत्पन्न साठ टक्क्यांनी घटले
पिंपरी – राज्याच्या काना-कोपऱ्यापर्यंत नागरिकांना वाहतूक सेवा देणाऱ्या लालपरीला अजूनही करोनाचे फटके बसत आहेत. यंदाच्या दिवाळीत वल्लभनगर आगाराचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत सत्तर टक्क्यांनी कमी झाले आहे. गतवर्षी वल्लभनगर आगाराला सुमारे 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यंदा प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अवघे दोन ते अडीच लाख इतकेच उत्पन्न गुरुवार (दि.19) पर्यंत आगाराला मिळाल्याने प्रशासनाची निराशा झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) लालपरीला दिवाळीत चांगल्या महसुलाची अपेक्षा असते. मात्र, यंदा कोविड 19 मुळे अनेकांनी गावी जाण्याचे टाळले किंवा अनेक नागरिक लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी परतले असलयाने दिवाळीत एसटीला दरवर्षी प्रमाणे गर्दी नव्हती. यामुळे आगाराचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त वल्लभनगर आगार प्रशासनाने 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान 10 जादा बसेसचे नियोजन केले होते.
पिंपरी-चिंचवड येथील बहुसंख्य कामगार, नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी गेले होते, ते अद्याप परतले नाहीत. शहरातीलही अनेक नागरिकांनी करोनामुळे गावी जाणे टाळले. तसेच शाळा कॉलेज बंद असल्याने दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थींची संख्या कमी होती. यामुळे यंदा जादा व अन्य बसेसला प्रतिसाद मिळाला नाही.
येत्या काळात आगाराचे उत्पन्न वाढवण्यासाठी नियोजन केले असून प्रवाशांना अजून सोयी-सुविधा पुरविल्या जातील. सुरक्षित सेवा देण्यासाठी आगार प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना देवदर्शन व अन्य कामानिमित्त आगाराच्या बसेस उपलब्ध केल्या जात आहेत. तर, 40 जणांना ग्रुप बुकिंगची सुविधा सुरु केली आहे.
पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख