चला, गौरी-शाहरुखच्या दिल्लीतील घरात रहायला…

पर्यटकांसाठी ठरणार अभिनव मेजवानी

नवी दिल्ली – दक्षिण दिल्लीतील वृक्षराजी आणि हिरवळीने समृद्ध अशा पंचशील पार्कमध्ये खान कुटुंबाचे परंपरागत घर असून गौरीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्याची सजावट करण्यात आली आहे. हे सेलिब्रिटी कुटुंब मुंबईत राहात असले तरी त्यांच्या आयुष्यात आणि आठवणींमध्ये दिल्लीच्या या घराला विशेष स्थान असून आपल्या मुलांचे संगोपन त्यांनी या घरात केले आहे आणि आजही दिल्लीत आले की ते याच घरात राहतात. व्यक्तिगत वापराच्या वस्तू आणि जगभरातील प्रवासात जमा झालेली स्मृतिचिन्हे यांनी हे घर भरले असून शाहरुख आणि गौरी यांचा सुरुवातीच्या काळातील जोडपं म्हणून आणि नंतर एक संपूर्ण कुटुंब म्हणून झालेल्या प्रवासाचे प्रतिबिंब या घराच्या रुपाने पाहायला मिळते.

आता या घराची दारे पर्यटकांसाठीही खुली करण्यात आली असून एअरबीएनबीच्या माध्यमातून आयोजित एका देशव्यापी स्पर्धेतील विजेत्याला या घरात राहण्याचे भाग्य मिळणार आहे. आयुष्यात एकदाच मिळणारी अशी संधी देऊन बॉलिवुड आयकॉन शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझाइनर पत्नी गौरी खानने “होम विथ ओपन आर्म्स’ या उपक्रमासाठी आपले घर देऊ केले आहे. ही मोहीम भारतीयांना खान कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात राहण्याची संधी देणार आहे.

दिल्लीतील एरवीच्या गजबजाटात जणू शांततेचे प्रतीक असलेले खान कुटुंबाचे हे घर ठाशीव रंगछटा, असंख्य खिडक्‍यांमधून येणारा भरपूर उबदार व नैसर्गिक प्रकाश आणि कलात्मक वस्तूंच्या लक्षवेधक संग्रहाने नटलेले आहे. समृद्ध पोताच्या भिंती, रंगबिरंगी कापडी चित्रे (टेपेस्ट्रीज) आणि चमकदार झुंबरांमुळे हे घर उजळून निघाले आहे. जमिनीपासून छतापर्यंत भिडलेले फ्रेंच पद्धतीचे दरवाजे रंगबिरंगी छटांच्या फुलांनी भरलेल्या विस्तीर्ण बागेत आपल्याला घेऊन जातात.
“होम विथ ओपन आर्म्स मोहिमेमुळे पाहुण्यांना बॉलिवुडच्या या सुप्रसिद्ध जोडप्याचा नॉस्टॅल्जिया पुन्हा जगण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे.

दिनांक 18 नोव्हेंबर पासून या कॅम्पेनला सुरुवात होणार असून भारतीय नागरिक या संधीचा विजेता होण्यासाठी अर्ज करू शकतात. विजेत्या भाग्यवान जोडप्याला 13 फेब्रुवारी 2021 रोजी या घरी राहण्याची संधी मिळणार आहे. विजेत्याची निवड 15 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे. विजेत्या जोडप्याला गौरीने स्वत: तयार केलेला कार्यक्रम, खान कुटुंबियांच्या पसंतीचे जेवण, शाहरुख खानच्या पसंतीचे, तसेच त्याचे स्वत:चे यशस्वी सिनेमे पाहाण्याची संधी आणि कुटुंबाकडून स्मृतीचिन्ह म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी पर्सनलाइज्ड वस्तूंची भेट मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.