पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीमार्फत शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्मार्ट टॉयलेटची उभारणी करण्यात येत आहे. जगताप डेअरीपाठोपाठ निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल येथे स्मार्ट टॉयलेट बनविण्यात आले आहे. मात्र, ते दिव्यांगांसाठी ते उपयुक्त नाही. “सुगम्य भारत योजने’अंतर्गत सार्जनिक ठिकाणच्या स्वच्छतागृहामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा असणे आवश्यक असतानाही त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.
पीपीपी तत्वावर स्मार्ट टॉयलेट शहरात उभारण्यात येत आहेत. “सुगम्य भारत’ अंतर्गत सावर्जनिक स्वच्छतागृहामध्ये अपंग व्यक्तींसाठी सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, शहरात जगताप डेअरी आणि त्यानंतर निगडी येथे हे स्मार्ट टॉयलेट उभारण्यात आले आहे. त्यात दिव्यांगासाठी रॅम्प आहे. मात्र, व्हीलचेअरसह दिव्यांगांना आत जाता येत नाही. व्हीलचेअरसह आत गेल्यास दार लागत नाही. तसेच जागा खूप अपुरी आहे. बेसिनपर्यंत हात पोहचत नाहीत. त्यामुळे या टॉयलेटचा वापर दिव्यांगांना करता येत नाही.
विचार होणार का?
स्मार्ट सिटी मार्फत शहरामध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी 15 वर्षाच्या कालावधीकरीता पीपीपी तत्वावर महिला व पुरुष असे स्वतंत्र कक्ष असलेले स्मार्ट सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. खासगी कंपनीद्वारे 26 ठिकाणी ई-टॉयलेटचे काम सुरू आहे. जानेवारी 2023 पर्यंत सर्व ई-टॉयलेटचे काम पूर्ण करण्यात येणार आहेत. स्मार्ट टॉयलेटमध्ये ऑटोमॅटिक फ्लॅशिंग सेन्सर, व्हॉइस असिस्टंट, पंखा, सीलिंग लाइट, पॉवर बॅकअप सुविधा आहेत. हे टॉयलेट उभारताना तरी दिव्यांगांचा विचार केला जाणार आहे का? असा प्रश्न आहे.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडे दिव्यांगांसाठीच्या स्वच्छतागृहाविषयी पाठपुरावा करत आहे. जुने टॉयलेट बांधून झालेली होती. त्यामुळे त्यात काही बदल करणे शक्य नाही. मात्र, आता नव्याने होणाऱ्या स्मार्ट टॉयलेट उभारताना तरी विचार गरणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मिनल येथे स्मार्ट टॉयलेट उभारण्यात आले आहे. तेथील टॉयलेटमध्ये एक पायरी आहे. त्यामुळे व्हीलचेअर आत नेता येत नाही. तसेच नेण्याचा प्रयत्न केल्यास दार लागत नाही. बेसिन उंचावर आहे.
– राजेंद्र वाकचौरे, शहर उपाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन.