अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शटरडाऊन
नगर – जिल्ह्यात करोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्ह्यात उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात शहरीभागासह ग्रामीण भागात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या बंदच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 27 दुकानांवर कारवाई करण्यात आली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपत्ती व्यवस्थापन 2005 मधील 30 अन्वये मिळलेल्या अधिकारानुसार साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1887 अन्वेयनुसार गुरुवारी जिल्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर पोलिसांसह महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शहर व ग्रामीण भागात बंदचे आवाहन केले. ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आज जिल्ह्यात सर्वच दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
शहरातील काही भागत दुकाने बंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे सायंकाळी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरून सक्तीने दुकाने बंद करण्यात आली. एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेश देण्यात आले होते. मात्र काही नागरिकांकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्याने त्यांच्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलिसांना दिले. त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई करत शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात नागरिकानी स्वत: हून आदेशाचे पालन केले. तर अनेक ग्रामपंचायतीने गावातील बाजार पेठ, तसेच आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले.
शहरातील कापडबाजार, सराफबाजार, सर्जेपुरा, बालिकाश्रम रस्ता, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रस्ता, गुलमोहर रस्ता, तसेच दिल्ली गेट, चौपाटी कारांजा, लाल टाकी, नवीपेठ माळीवाडा परिसर पूर्णत: बंद ठेवण्यात आला होता. तसेच नगर-औरंगाबाद, नगर-मनमाड रस्त्यावरील अनेक दुकांने, हॉटेल, मॉल्स, बंद करण्यात आले. त्यामुळे शहराकडे येणाऱ्या वाहनांची रहदारीचा ओघ कमी असल्याचे दिसत होता. जिल्ह्यात अकोले, पाथर्डी, राहाता या तालुक्यातही दुकाने बंद होते.
बाजार समितीत भूसार मालाची आवक घटली
करोनाच्या पार्श्वभूमीवर नगर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भूसार मालाची आवक पूर्णता: घटली आहे. तसेच व्यावसायीक गाळे बंद करण्यात आले असून जिवानावश्यक वस्तूंची विक्री सुरु होती. त्यातही नागरिकांचा ओघ कमी असल्याचे दिसत आहे.