नगर – विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील घडामोडीमुळे कॉंग्रेस पक्षांतर्गतच वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जाऊ लागल्या आहेत. एकीकडे कॉंग्रेस बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत असतांना दुसरीकडे मात्र नगर जिल्हा कॉंग्रेसने तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकी असून संपूर्ण नगर जिल्हा कॉंग्रेस आता सत्यजित तांबे यांच्या मागे राहणार असल्याची स्पष्ट भूमिका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलतांना सोमवारी व्यक्त केली.
सांळुखे म्हणाले की, पक्षाने घेतलेली भूमिका चुकीची वाटते. तरूणांना संधी दिली पाहिजे. आजवर प्रदेश युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्या युवकांनी नेत्यांनी काम केले. त्यांना पुढे पक्षाकडून विधानपरिषदेची संधी देण्यात आली. मग सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय का? युवकचे प्रदेशाध्यक्ष असतांना तांबे यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केले. मग विधानपरिषदेची संधी का दिली गेली नाही. आताही डॉ. तांबे यांनी माघार घेऊन सत्यजित यांना संधी दिली. त्या काय चुकले. पक्षाकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. पण पक्षाने विचार केला नाही. त्यानंतर चर्चेने हा विषय मार्गी लावता आला असता पण तसेच न करता डॉ. तांबे यांच्यावर कारवाई करण्यात आली.आता सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई केली जात आहे. परंतू जिल्ह्यातील संपूर्ण कॉंग्रेस आज तांबे यांच्या मागे उभी राहणार आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते तांबे यांचा प्रचार करणार असून त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका सांळुखे यांनी व्यक्त केली.