नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वाहन वितरकांच्या संघटनेने म्हटले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या उत्सवांच्या महिन्यात वाहन विक्री वाढण्याबाबत आशावाद व्यक्त करण्यात आला.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या वर्षी प्रवासी वाहन विक्रीत 10 टक्क्यांची वाढ झाली. त्या महिन्यात 1,95,700 वाहने विकली. याचा अर्थ लॉकडाऊनचा वाहन विक्रीवरील परिणाम संपुष्टात आला आहे. मात्र, एकट्याने प्रवास करण्यास सोयीची वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली असली तरी सप्टेंबर महिन्यामध्ये दुचाकी वाहन विक्री 12 टक्क्यांनी कमी होऊन ती 10 लाख झाली आहे. ती आगामी काळता वाढण्याची शक्यता आहे.
कशामुळे विक्री वाढली
सध्या व्याजदर कमी असून बॅंक वाहन कर्ज वाढावे याकरिता प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांनी नवी वाहने लॉन्च केली नव्हती. ती वाहने सध्या मोठ्या प्रमाणात लॉंच होत आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून एकट्याने प्रवास करण्यासाठी छोटी वाहने उपयुक्त ठरतात. या कारणामुळे वाहन विक्री वाढत असल्याचे वितरकांच्या संघटनेचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले.