भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील दुर्गम अशा भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन ध्रुव प्रतिष्ठानने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. दुर्गम भागातील शाळांना पटसंख्येनुसार संगणक व सौर पॅनल सिस्टीम वाटपात पहिल्या टप्प्यामध्ये ४० संगणक व १५ सौर पॅनल सिस्टीमचे वाटत सुरुवात कर्नावड केंद्रातील शाळांपासून करण्यात आली.
नाझरे झुलता पूल, नाझरे गावठाण, कर्नावड, रावडी, चिखलगाव,धोंडेवाडी, येथील शाळांना संगणक तर टिटेघर, वडतुंबी या जिल्हा परिषदेच्या शाळांना सौर पॅनल सिस्टीमचे वाटप करण्यात आले. आंबवडे केंद्रामध्ये वाटप करण्यात येणार असून पंधरा पटाच्या पुढील शाळांना संगणक वाटप होणार असून मोठ्या शाळा व हायस्कूलसाठी सौर पॅनल सिस्टीमचे वाटप होणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांचे सहकार्य लाभले आहे. चालू वर्षी संस्थेचे १०० संगणकाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शिक्षक व शाळा यांचे सहकार्य मिळत आहे, असेही केळकर म्हणाले.