पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. दूरस्थ शिक्षणाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेमार्फत दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. लॉकडाऊनमुळे अद्यापही काही विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता आलेला नाही. तसेच काही अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचे निकाल अजूनही जाहीर व्हायचे आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली.
दरम्यान, दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुदतवाढ दिल्याने या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश घ्यावेत, असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले.
तथापि, मागील वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यांना अभ्यासाचे साहित्य पोहोचविण्यात करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे अडचणी येत आहेत. विभागाकडे सर्व विषयाचे अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होताच एक आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य दिले जाणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी म्हटले आहे.