पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये 83 हजार 124 बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, अद्यापही 32 हजार 353 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत.
करोनामुळे यंदा “आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून सतत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ शनिवारी (दि.28) संपली.
आता आणखी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्नही पालकांकडून उपस्थित होत आहे. 9 हजार 331 शाळांमध्ये 1 लाख 15 हजार 477 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 2 लाख 91 हजार 368 ऑनलाइन अर्ज आले. एकूण 1 लाख 33 हजार 950 मुलांची निवड झाली. त्यात 69 हजार 699 मुलांचे तात्पुरते प्रवेश झाले.
नियमित प्रवेश फेरीतून 1 लाख 926 मुलांची निवड झाली. त्यातील 68 हजार 230 मुलांचे प्रवेश निश्चित झाले. प्रतिक्षा यादीतील 33 हजार मुलांना संधी उपलब्ध झाली. मात्र, प्रत्यक्षात 14 हजार 894 जणांनी प्रवेश घेतला.
पुणे जिल्ह्यातील 972 शाळांमध्ये 16 हजार 950 प्रवेशाच्या जागा दर्शवल्या होत्या. यासाठी 62 हजार 919 मुलांचे अर्ज दाखल झाले होते. नियमित प्रवेश फेरीतील 16 हजार 617 मुलांपैकी 11 हजार 143 जणांकडून प्रवेश घेण्यात आला. प्रतिक्षा यादीतील 6 हजार 423 मुलांपैकी 3 हजार 147 जणांनीच प्रत्यक्षात प्रवेश नोंदविला.