सहकारनगर -निसर्गरम्य तळजाई टेकडीवर पुन्हा एकदा फुकट्या जाहिरातीबाजीला ऊत आला आहे. याबाबत सामान्य नागरिकांसह वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त केला आहे.
टेकडीवर दररोज हजारो नागरिक व्यायाम तसेच पर्यटनासाठी येत असतात. ही गर्दी “कॅश’ करण्याचा प्रयत्न अशा जाहिरातबाजी करणाऱ्यांकडून होत आहे. तळजाईवर जाणाऱ्या रस्त्यावर असे काही फ्लेक्स दिसू लागले आहेत. जाहिरात करताना झाडांना खिळे, तारा लावून फ्लेक्स बांधले जात असल्याने झाडांची हानी होऊ शकते, याकडे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह मनपाच्या आकाशचिन्ह विभागाचे दुर्लक्ष आहे. अनधिकृत फ्लेक्स लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शरीर निरोगी राहण्यासाठी अनेक नागरिक तळजाईवर व्यायामासाठी येतात. यामध्ये मंत्री, आमदार अनेक नगरसेवक (माजी) ही असतात, अशा लोकप्रतिनिधींकडूनही अशा फुकट्या जाहिरातींकडे डोळेझाक केली जात आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी फुकट्या जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी.
– जयराज लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना