वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली (तालुका हवेली) येथे माजी उपसरपंच संदीप सातव यांनी कोट्यावधी रुपयांच्या केलेल्या विकास कामांचे कौतुक व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाघोली येथे आले होते. या कार्यक्रमात अंतर्गत रस्ते पिण्याचे पाणी सांडपाणी याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संदीप सातव यांनी केलेल्या कामांचे कौतुक चंद्रकांत पाटील करत होते.
या कार्यक्रमास उपस्थित जनसमुदाय हा हजारांच्या घरात होता. यावेळी व्यासपीठावर गर्दी असल्याने माजी उपसरपंच संदीप सातव यांना बसण्यास जागा नसल्याने ते उभे होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी संदीप सातव यांना बसण्याची विनंती केली व बसण्यास जागा नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी “माझी खुर्ची रिकामी आहे. तुम्हाला देतो, तिथे बसा” असे सांगितले शिवाय माझ्या खुर्चीची किंमत खूप मोठी आहे असे सांगताच एकच हास्यकल्लोळ उडाला.
पण विनम्रपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या खुर्चीची ऑफर संदीप सातव यांनी नाकारत उपस्थित पदाधिकारी यांनी संदीप सातव यांना बसण्यास जागा केल्याने कार्यक्रम पुढे रंगतदार अवस्थेत आला. भाजपच्या प्रदेशाध्यक्षने संदीप सातव यांना दिलेल्या खुर्चीच्या ऑफरची सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.