पुणे -भारताचा आघाडीचा पुरुष टेबल टेनिसपटू हरमीत देसाई आणि रिथ रिश्या टी यांनी अविश्वसनीय कामगिरी करताना गोवा चॅलेंजर्सला 9-6 अशा फरकाने यू मुंबा टीटीवर विजय मिळवून दिला. फॉर्मात असलेल्या यू मुंबा टीटी संघाला अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या अखेरच्या सामन्यात यू मुंबाला 3-0 असा विजय मिळविणे गरजेचे होते. यू मुंबा टीटीकडून लिली झॅंग आणि गोवा चॅलेंजर्सकडून रिथ तेनिसन खेळल्या. यू मुंबाच्या लिलीने पहिल्या गेममध्ये दमदार खेळ करताना सर्व्हिसच्या जोरावर 88 टक्के गुण कमावत 11-6 अशी बाजी मारली.
या गेममुळे यू मुंबा टीटीने पिछाडी 6-7 अशी कमी केली. तिसऱ्या गेममध्ये लिली झॅंगने चांगले पुनरागमन केले होते, परंतु रिथने झटपट गुण घेत 9-5 अशी आघाडी मिळवली. रिथने 11-6 असा हा गेम घेताना गोवा चॅलेंजर्सचा विजयही पक्का केला. तिसरा गेम 11-9 असा जिंकून रिथने यू मुंबाचा 6-9 असा पराभव केला. त्याआधी मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांच्यातली पुरुष एकेरीची लढत निर्णायक ठरणारी होती. मानव ठक्करने पहिला गेम 11-10 असा घेत यू मुंबा टीटीला ही बरोबरी मिळवून दिली होती.
दुसऱ्या गेममध्ये गोवा चॅलेंजर्सच्या हरमीतने चांगला खेळ केला. मानवकडून त्याला प्रत्युत्तर मिळताना दिसले, परंतु हरमीतने 11-7 असा हा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मानव व हरमीत यांच्यात रॅलीचा सुरेख खेळ पहायला मिळाला. दोन्ही खेळाडू एकमेकांना मागे ढकलून खेळण्यास भाग पाडताना दिसले. हरमीतने 11-8 अशी बाजी मारली. सर्वोत्तम रॅंकिंग असलेला खेळाडू क्वाद्री अरुणाने पुरुष एकेरीत 2-1 अशा फरकाने गोवा चॅलेंजर्सच्या अलव्हारो रॉब्लेसचा पराभव केला.
क्वाद्रीने पहिला गेम 11-6 असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या खेळाडूने क्वाद्रीला सडेतोड उत्तर दिले. त्याने फोरहॅंडचे सुरेख फटके मारले. पण, या गेमचा निकाल क्वाद्रीच्याच बाजूने 11-10 असा लागला. तिसरा गेम देखील अलव्हारोच्या बाजूने 11-8 असा गेला. महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात सुथासिनी सवेत्तबटने 2-1 अशा फरकाने दिया चितळेचा पराभव करून गोवा चॅलेंजर्सला 3-3 अशी बरोबरी मिळवून दिली. सुथासिनीने पहिला गेम 11-7 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दियाने प्रतिकार केला, परंतु तिला विजय मिळवता आला नाही.
सुथासिनीने हाही गेम 11-9 असा जिंकला. दियाने तिसऱ्या गेममध्ये 11-9 असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत हरमीत देसाई/सुथासिनी यू मुंबाच्या मानव ठक्कर/लिली झॅंग जोडीवर 2-1 असा विजय मिळवला आणि गोवा चॅलेंजर्सला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली. हरमीत/सुथासिनी यांनी सामन्यावर चांगली पकड घेतली होती. गोवा चॅलेंजर्सच्या हरमीत/सुथासिनी जोडीने पहिले दोन गेम 11-8, 11-8 असे जिंकून आघाडी मिळवली. मानव/लिलीने तिसरा गेम 11-7 असा जिंकला.
निकाल
गोवा चॅलेंजर्स 9-6 यू मुंबा टीटी
अलव्हारो रॉब्लेस 1-2 क्वाद्री अरुणा (6-11,10-11, 11-8)
सुथासिनी सवेत्तबट 2-1 दिया चितळे (11-7, 11-9, 9-11)
हरमीत/सुथासिनी 2-1 मानव/लिली (11-8, 11-8, 7-11)
हरमीत देसाई 2-1 मानव ठक्कर ( 10-11, 11-7, 11-8)
रिथ तेनिसन 2-1 लिली झॅंग ( 6-11, 11-6, 11-9)