पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी सतेज करंडक कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या अंकुर स्पोर्टस् क्लब व कोल्हापूरच्या शाहू सडोली संघाने तर महिलांमध्ये स्वामी समर्थ संघ व बारामती स्पार्ट क्लब, कला क्रीडा निकेतन संघांनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मुंबईच्या अंकुर स्पोर्टस् संघाने पुण्याच्या भैरवनाथ संघावर 49- 24 अशी मात करीत स्पर्धेतील पहिला विजय मिळविला. मध्यंतराला अंकुर संघाकडे 23-12 अशी आघाडी होती. पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात शाहू सडोली संघाने पुण्याच्या श्रीकृष्ण संघाचा 51-34 असा पराभव केला. मध्यंतराला शाहू सडोली संघाकडे 27-14 अशी आघाडी होती. शाहू सडोलीच्या ओंकार पाटील व रोहित साठे याने चांगला खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यांना अक्षय पाटील व हर्षद पाटील यांनी सुरेश पकडी केल्या. उपनगरचा जॉली कबड्डी संघ हा वेळेत उपस्थित न राहिल्याने त्या संघाला स्पर्धेतून बाद करण्यात आले.
महिलांच्या होतकरू संघ ठाणे व डॉ. पतंगराव कदम संघात झालेला अत्यंत अटीतटीचा सामना 32-32 असा समान गुणांवर संपला. त्यामुळे दोन्ही संघांना एक एक साखळी गुण देण्यात आले. महिलांच्या दुसऱ्या सामन्यात स्वामी समर्थ संघाने नाशिकच्या रचना स्पोर्टस् संघावर 31-25 असा विजय मिळविला.
महिलांच्या तिसऱ्या सामन्यात कला क्रीडा निकेतन संघाने माऊली प्रतिष्ठान उपनगर संघावर 41-19 असा एकतर्फी विजय मिळविला. यावेळी स्पर्धा आयोजक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, सविता दगडे, सुनील चांदेरे, समीर चांदेरे, जयवंत बोडके, नितीन चांदेरे, सुखदेव चांदेरे, दत्तात्रय कळमकर, दत्तात्रय झिंजुर्डे, रामदास धनकुडे, पंच प्रमुख राजेश अनुभवणे, इम्रान शेख आदी उपस्थित होते.